Maldives : भारताच्या वाकड्यात जाणं मालदीवला पडलं भारी, पर्यटक रोडावल्याने एका फटक्यात 400 कोटींचा फटका
Maldives Vs Lakshadweep : पंतप्रधान मोदी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असताना मालदीवच्या काही मंत्र्यांनी त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्यं केली होती. त्यानंतर दोन देशांमध्ये तणाव वाढल्याचं दिसून आलं.
मुंबई: संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर आधारित असलेल्या मालदीवला (Maldives) भारताशी पंगा घेणं चांगलच महागात पडल्याचं दिसून येतंय. भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळल्यानंतर आता मालदीवला 400 कोटींचा फटका बसल्याचं एका अहवालात सांगितलं आहे.
भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक व्यासपीठावर त्याचा प्रचार करतात. मोदी हे लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अवमानजनक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भारत आणि मालदीवच्या संबंधामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. नंतर भारतीय पर्यटकांनी मालदिववर बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं.आता त्याचा परिणाम मालदीवला भोगावे लागत आहे.
मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीत भारताचा सर्वात वरचा क्रमांक लागतोय. मालदीव सरकारच्या एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा पर्यटकांच्या खर्चातून येतो. मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक संख्येने भारतीय आहेत. एका अहवालानुसार मालदीवचे जवळपास 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान
मालदीवमध्ये 180 हॉटेल्स आहेत, ज्यासाठी भारत ही मुख्य बाजारपेठ आहे. येत्या काही महिन्यांत मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मालदीवचे आतापर्यंत 25-50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 400 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे. याचा परिणाम तिथल्या हॉटेल व्यावसायिकांवर होणार असल्याचं चित्र आहे.
मालदीवमध्ये भारतीय पर्यटक सर्वाधिक
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये भारत देशासाठी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ आहे. मालदीवमध्ये सर्वाधिक 2,09,198 पर्यटक भारतातून आले होते. त्यानंतर रशियाचे 2,09,146 पर्यटक होते. 1,87,118 पर्यटकांसह चीन तिसऱ्या स्थानावर आहे. 2022 मध्ये भारत 2,40,000 पर्यटकांसह मालदीव पर्यटन बाजारपेठेत अव्वल होता. त्यावेळी रशिया 1,98,000 पर्यटकांसह दुसऱ्या स्थानावर आणि 1,77,000 हून अधिक पर्यटकांसह ब्रिटन तिसऱ्या स्थानावर होता.
मालदीव त्याच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठे क्षेत्र म्हणून पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवच्या जीडीपीच्या 28 टक्के क्षेत्र हे पर्यटन व्यवसायाचे आहे आणि त्यातून 60 टक्के परकीय चलन प्राप्त होते.
गेल्या वर्षापर्यंत मालदीवची गणना भारताच्या चांगल्या मित्रांमध्ये होत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोहम्मद मोइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे बिघडू लागले होते. मात्र नुकत्याच घडलेल्या या प्रकरणामुळे भारतातील लोकांमध्येही संताप निर्माण झाला आहे.
ही बातमी वाचा :