महिलांना तीन सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता? यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस?
Monsoon Session 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे.
![महिलांना तीन सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता? यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस? maharashtra monsoon assembly budget session 2024 updates provision for ladli behna scheme free electricity for farmers stipend for jobless youngsters महिलांना तीन सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता? यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/d800e050a1d2a56652694ce6c06188e61719544699923988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य सरकार आज (28 जून) अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतुदी असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंचित, बलुतेदार, महिला, तरुण यांना या अर्थसंकल्पात झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याचीही तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
महिलांना तीन सिलंडर मोफत
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना राज्य सरकारच्या या आर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आले आहे. यावेळी सरकार महिला, तरुणांना आकर्षित करण्यासाठी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याअंतर्गतच महिलांसाठी वर्षाला तीन मोफत घरगुती गॅस सिलिंडरची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारतर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबली जाईल. या योजनेचा साधारण दोन कोटी कुटुंबांना फायदा होईल असा दावा केला जात आहे. तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही राबवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाण्याची शक्यता आहे. हा लाभ 21 ते 60 वर्षांपर्यंच्या तीन कोटी 50 लाख महिलांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांना आर्थिक स्वरुपात मदत व्हावी यासाठी ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी मोफत वीज?
सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात करू शकते. लघु व मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी ही मोफत वीज दिली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल. अल्प व मध्यम भूधारक 44 लाख शेतकऱ्यांचा या योजनेला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तरुणांना मिळणार भत्ता?
युवा वर्गालाही खुश करण्यासाठी राज्य सरकार नव्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला भत्ता दिला जाऊ शकतो. बारावी पास युवकांना मासिक 7 हजार रुपये, आयटीआय डिप्लोमाधारकांना मासिक 8 हजार, पदवीधारकांना मासिक 10 हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांसाठी ही मदत दिली जाऊ शकते. 18 ते 29 वयोगटाच्या तरुणांना या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
राज्य सरकार आज सादर करणार अर्थसंकल्प, कोणकोणत्या घोषणा करणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)