(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LPG Price Reduced: LPG स्वस्त! 'या' ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर मिळणार 40-40 रुपयांची सूट
Commercial LPG Price Update: सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या किमतींची माहिती दिली. आजपासून कमी दर लागू...
LPG Price : LPG सिलेंडर (LPG Cylinder) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Cylinder Prices) कमी केल्या आहेत. यानंतर आता 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत, किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आजपासून किमतींमध्ये बदल
अपडेटनुसार, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हणजेच, OMC नं 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. तेल विपणन कंपन्यांनी म्हटलं आहे की, व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किंमती आजपासून म्हणजेच, 22 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. म्हणजेच, आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे.
3 महिन्यांत किमतीत किती रुपयांची वाढ?
यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती सातत्यानं वाढत होत्या. गेल्या 3 महिन्यांत त्यांच्या किमतींत तिनदा वाढ करण्यात आली होती आणि त्यादरम्यान सिलेंडरच्या किमती 320 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वेळी, या महिन्याच्या पहिल्या दिवशी, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत प्रत्येकी 21 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या किमती 101 रुपयांनी आणि ऑक्टोबर महिन्यात 209 रुपयांनी वाढल्या होत्या.
चारही महानगरांमधील नव्या किमती
आज किमतीतील बदलानंतर मुंबईत सर्वात स्वस्त एलपीजी सिलेंडर ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे, तर चेन्नईच्या ग्राहकांना सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे. चार महानगरांमध्ये एलपीजीच्या किमती मुंबईत सर्वात कमी आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक आहेत. तर किमतींत घट झाल्यानंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून 1,710 रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये प्रभावी किंमत 1,929 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे, आता दिल्लीत किंमत 1,757 रुपये आणि कोलकातामध्ये 1,868.50 रुपये झाली आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती 'जैसे थे'
एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळत आहेत. तर तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात 929 रुपयांना, मुंबईत 902.50 रुपयांना आणि चेन्नईत 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.