LIC Share News: एलआयसीने दिला झटका; आता गुंतवणुकदारांनी काय करावे?
LIC Share Price : एलआयसीचा शेअर पहिल्याच दिवशी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर आता नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
LIC Share Price : बहुप्रतिक्षित असलेल्या एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आज सूचीबद्ध (लिस्टिंग) झाला. शेअर बाजारात लिस्ट होताना एलआयसीचा शेअर जवळपास 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीच्या या निराशाजनक लिस्टिंगचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. त्यामुळे पुढं आता नेमकं काय करावं असा प्रश्न अनेक गुंतवणुकदारांना पडला आहे.
एलआयसीने आपल्या प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. एलआयसीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसनुसार कंपनीचे बाजार भांडवल मूल्य हे 6 लाख कोटींपेक्षा अधिक होते. मात्र कमकुवत लिस्टिंगमुळे यामध्ये 42 हजार 500 कोटींची घट झाली. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 60 रुपये प्रति शेअर सवलत देण्यात आली होती.
गुंतवणुकदारांनी काय करावे?
एलआयसी लिस्टिंगनंतर काही वेळेनंतर शेअर सावरू लागला होता. एलआयसीच्या शेअरने 918 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नफा वसुली आणि विक्री सुरू झाल्याने शेअरमध्ये घसरण झाली.
मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसच्या हेमांग जानी यांनी म्हटले की, एलआयसीची लिस्टिंग कमी किंमतीत झाली. मात्र, आकर्षक मूल्यांकन आणि बाजारातील स्थिरता लक्षात घेता किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार एलआयसीकडे वळू शकतात असे त्यांनी म्हटले.
Macquarie या परदेशी ब्रोकरेज फर्मने एलआयसीला टार्गेट प्राइस 1000 रुपये सांगितले आहे. त्याशिवाय न्यूट्रल रेटिंगही दिली आहे. Macquarie चे टार्गेट प्राइसिंग इश्यू किंमतीपेक्षा 5.37 टक्के अधिक आहे.
एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियमचा दर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला वधारला होता. त्यानंतर हा प्रीमियम दर घसरू लागला होता. एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते. त्यानंतर आज एलआयसी शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये काही निराशेचे वातावरण आहे.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. )