(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी उरले फक्त 3 दिवस, प्रशासनाची तयारी पूर्ण
लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता शनिवारी (17 ऑगस्टला) महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार (Govt) पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता शनिवारी (17 ऑगस्टला) महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांचा हप्ता एकाच वेळी म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. हा हप्ता जमा होण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत.
राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार
लाडकी बहीण योजनेंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे 17 ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत हाच हेतू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दरमायन, ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढावे. तसेच 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातील 1 कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
17 ऑगस्टला मिळणार लाडकी बहिण योजनेचा हप्ता, नागपूर प्रशासनाची तयारी पूर्ण
17 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठी नागपूर मध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 17 लाख 10 हजार अर्जांपैकी असून 5 लाख 70 हजार लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी झाली आहे. या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला हप्ता दिला जाणार असल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले. रोज जवळपास वीस हजार अर्जाच्या पडताळणीचे काम सुरु लवकरच उर्वातीत अर्जाचीच पण पडताळणी पूर्ण केली जाणार असल्याचे विपीन इटनकर यांनी सांगितले.
पुण्यात महायुती सरकार करणार मोठं शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी वितरीत केला जाणार आहे. त्यापूर्वी शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचं महायुतीचं सरकार मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये शनिवारी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती राहणार आहेत. इतकंच नाही तर या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पालकमंत्रीही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातून एका क्लिकवरती कमीत कमी एक कोटीहून अधिक महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून सरकारचं मोठं शक्ती प्रदर्शन असेल.
महत्वाच्या बातम्या:
लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी 'स्वतंत्र बँक अकाऊंटची' अट का? जाणून घ्या सविस्तर माहिती