Japanese Company in India: 180 एकरांवर प्लांट, हजारो रोजगार, अर्थव्यवस्थेला चालना अन् चीनला दणका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात!
TDK भारतात आल्यानं रोजगाराच्या संधी वाढतील आणि आयटी व्यावसायिकांना सर्वाधिक फायदा होईल.
Japanese Company TDK in India: परदेशी कंपन्यांचा (Foreign Companies) ओढा भारताकडे (India) वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या (Technology and Electronics) बाबतीत जगात अव्वल मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनीही याला अपवाद नाही. जपानची नामांकीत कंपनी लवकरच भारतात येत आहे. चीनसाठी (China) मात्र हा सर्वात मोठा धक्का आहे. याचं कारण म्हणजे, चीनच्या चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्यांनी चीनकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच परदेशी कंपन्या चीनला पर्याय म्हणून भारताचा विचार करत आहेत. आता नामांकीत जपानी कंपनेनंही भारतात आपला व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, जपानमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक टीडीके कॉर्पोरेशन (TDK Corporation) भारतात येत आहे. ही कंपनी Apple Inc ची जागतिक लिथियम आयर्न (Li-ion) बॅटरी पुरवठादार आहे. TDK भारतात Apple च्या iPhone साठी बॅटरी सेल तयार करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी भारतात Apple च्या लिथियम आयर्न बॅटरीसाठी सेल असेंबलर सनवोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पुरवठा करेल. सध्या देशात फक्त सनवोडा इलेक्ट्रॉनिक्स लिथियम आयर्न बॅटरी सेलचा पुरवठा करते. सनवोडा जगभरातील विविध बाजारपेठांमधून बॅटरी आयात (Import) करते.
हरियाणामध्ये खरेदी केलीय 180 एकर जमीन
TDK भारतातील लिथियम आयर्न बॅटरी सेल तयार करण्यासाठी हरियाणातील मानेसर येथे एक प्लांट उभारणार आहे. त्यासाठी त्यांनी हरियाणामध्ये 180 एकर जमीन खरेदी केली आहे. Apple ला पुरवठा करण्यासाठी TDK लवकरच बॅटरी सेलचं उत्पादन सुरू करणार आहे. याशिवाय भारतासाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, या प्लांटमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशात नोकरीच्या संधी वाढतील आणि आयटी व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होईल. TDK च्या अॅपल सेलच्या भारतात उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. विदेशी रेटिंग एजन्सींनी आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.
हजारो रोजगाराच्या संधी
आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर बिझनेस स्टँडर्डचा अहवाल शेअर केला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'भारतात मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी PLI योजनेचा आणखी एक मोठा विजय. Apple साठी सेलचा सर्वात मोठा पुरवठादार TDK, मानेसर, हरियाणा येथे 180 एकर जमिनीवर एक युनिट स्थापन करणार आहे, जिथे #MadeInIndia iPhone बॅटरी सेल तयार केले जातील. Apple, TDK आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. देशातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेला प्रोत्साहन देण्याचं आणि जगभरातील मोठ्या आणि आघाडीच्या कंपन्यांना येथे आणण्याचं भारत सरकारचं ध्येय साध्य केल्याबद्दल अभिनंदन. TDK भारतात आल्यानं 8 हजार ते 10 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील.