(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुंतवणुकीच्या 'या' फॉर्म्यूल्याचा विषय खोल, डोकं लावल्यास तुम्हीही व्हाल करोडपती!
प्रत्येकालाच करोडपती होण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही अगदी कमी काळात करोडपती होऊ शकता.
Investment Tips: प्रत्येकालाच करोडपती व्हावसं वाटतं. त्यासाठी प्रत्येकाची आपापल्या परीने धडपड चालू असते. खूप जास्त मेहनत केली म्हणजे जास्त पैसा येईल आणि मी करोडपती होईल, अशी अनेकांची धारणा असते. पण योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास तुम्ही कमी वेळात चांगले पैसे कमवू शकता. चांगला अभ्यास करून पैसे गुंतवल्यास तुम्ही थेट कोट्यधीशही होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक आणि कडक शिस्त बाळगणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी पाळल्यास 20000-25000 पगार असला तरीदेखील करोडपती होता येतं.
करोडपती होण्यासाठी कोठे गुंतवणूक करावी?
तुम्ही महिन्याला छोटी-छोटी गुंतवणूक करून करोडपती होऊ शकता. कमी पगार असला तरी हे शक्य आहे. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातू म्यूच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो आणि तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला दीर्घ काळासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागेल. एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून कोट्यधीश होण्याची संधी असते.
1 कोटी रुपये हवे असतील तर किती रुपयांची एसआयपी करावी?
एक कोटींचा फंड हवा असेल तर एसआयपीमध्ये किती रुपये गुंतवावे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. हे समजून घेण्यासाठी तुमचा पगार हा 25000 रुपये आहे, असे गृहित धरू. इतर आर्थिक नियोजन लक्षात घेऊन तुमच्या पगारातील जवळपास 15-20 टक्के रक्कम ही कोठेतरी गुंतवली पाहिजे, असे म्हटले जाते. त्यामुळे तुमचा पगार 25 हजार रुपये आहे, असे गृहित धरल्यास तुम्ही 4000 ते 5000 रुपयांची गुंतवणूक करायला हवी. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मात्र एसआयपी ही भांडवली बाजाराशी निगडित असल्यामुळे येथे पैसे गुंतवणे थोडे जोखमीचे असते. मात्र गेल्या काही वर्षांचा अभ्यास पाहता एसआयपीत गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्क्यांचे रिटर्न्स मिळतात, असे म्हटले जाते.
तुम्हाला एक कोटी रुपये कधी मिळणार?
समजा तुम्ही महिन्याला चार हजार रुपयांची एसआयपी केली आणि तुम्हाला 12 टक्के रटर्न्स मिळाले तर तुम्ही 28 वर्षांत ( 339 महिने) 1 कोटी रुपयांचा फंड तयार कराल. तुम्ही 5000 रुपयांची एसआयपी केल्यास तर 1 कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला 26 वर्षे ( 317 महिने) लागू शकतात. तुम्ही तुमच्या पगारातील साधारण 30 टक्के रक्कम म्हणजेच 7000 रुपये एसआयपीत गुंतवल्यास तुम्हाला 1 कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी 23 वर्षे ( 276 महिने) लागतील. पगाराची 40 टक्के रक्कम म्हणजेच 10000 रुपये एसआयपीत गुंतवले तर 20 वर्षांत ( 248 महिने) तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील.
स्टेप अप एसआयपीची जादू
तुम्हाला एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी लागणारा कालावधी जास्त वाटत असेल तर तुम्ही स्टेप अप एसआयपीचा मार्ग निवडू शकता. या फॉर्म्यूल्यामुळे तुम्हाला लवकर एक कोटीचा फंड उभा करता येईल. या फॉर्म्यूल्या अंतर्गत तुम्हाला दरवर्षी एसआयपीमध्ये थोडी-थोडी वाढ करावी लागेल. एसआयपीमध्ये पाच टक्के, दहा टक्के अशा हिशोबाने तुम्हाला या एसआयपीमध्ये वाढ करता येईल. यामुळे तुम्ही लवकर एक कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
दारूच्या नशेत तरुणाला बेल्टने मारलं, एका आदेशाने झिंग उतरवली; 'त्या' पोलीस अधिकाऱ्यावर मोठी कारवाई!
स्वप्नातलं घर घेण्यासाठी कर्ज हवंय? सर्वांत कमी व्याज घेणाऱ्या 'या' पाच बँकांचा व्याजदर काय?
तयारीला लागा ! लवकरच येणार आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ; खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी