Startups in India: भारतीय स्टार्टअप्सकडे गुंतवणुकदारांची पाठ; 9 वर्षांतील सर्वात कमी फंडिंग एप्रिलमध्ये
Indian Startup Funding: भारतीय स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यापासून गुंतवणूकदार मागे पडत आहेत. यावर्षी एप्रिलमध्ये, भारतीय स्टार्टअप्सना 58 डील्समध्ये केवळ 381 मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला आहे.
Indian Startup Funding: भारतीय स्टार्टअप्ससाठी (Indian Startups) मिळणाऱ्या फंडिंगमध्ये (Funding) मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एप्रिलमध्ये फंडिंग आणि डील्सची संख्या नऊ वर्षांतील सर्वात निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे भारतातील स्टार्टअप कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारतीय स्टार्टअप्समधील एंजल गुंतवणूक आणि वेंचर कॅपिटल फंडिंग एप्रिलमध्ये 58 डील्समध्ये 381 मिलियन डॉलर इतकं होतं.
VCCircle च्या रिसर्चनुसार, नऊ वर्षांतील हा सर्वात कमी फंड आहे. यापूर्वी, एप्रिल 2014 मध्ये सर्वात कमी आकडा होता, जेव्हा 108 मिलियन डॉलरच्या 50 डिल्सची घोषणा भारतीय स्टार्टअप्ससाठी करण्यात आली होती. एप्रिल 2022 मध्ये, भारतीय स्टार्टअप्सनी एकूण 3.3 अब्ज किमतीचे 146 करार केले. याच तुलनेत, 2023 मध्ये आतापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम एकट्या एप्रिल 2022 मध्ये नोंदवलेल्या रकमेच्या जवळपासही नाही.
मार्चमध्येही चांगली फंडिंग
या वर्षी मार्चमध्ये 1.1 अब्ज डॉलर किमतीचे स्टार्टअप फंडिंग व्यवहार झाले आहेत. फेब्रुवारीसाठी सुधारित संख्या 482 मिलियन असताना, मार्च 2022 मध्ये दाखल झालेल्या डील्सचे एकूण मूल्य निम्म्याहून कमी होते. 2021 या वर्षात भारतीय स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 2021 मध्ये खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांनी स्थानिक कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.
स्टार्टअप्ससाठी 2021 वर्ष चांगलं
भारतात 2021 मध्ये, 100 युनिकॉर्न किंवा 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक मूल्य असलेल्या स्टार्टअप्सनी चांगली वाढ नोंदवली. दरम्यान, शेअर बाजारातील सुधारणेसह, मध्यवर्ती बँकेनं कर्जाच्या व्याजातही वाढ केली, ज्यामुळे स्टार्टअप्समधील फंडिंग कमी होऊ लागला आणि एप्रिल 2023 मध्ये हा आकडा 9 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला.
का कमी झालं फंडिंग?
जगभरातील आर्थिक मंदीची भीती, शेअर बाजारातील अस्थिरता आणि कर्जाच्या व्याजात झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. गुंतवणूकदार स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे स्टार्टअप्समध्ये पैशांची मोठी कमतरता आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, चांगल्या स्टार्टअप कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. तसेच, येत्या काळातही स्टार्टअप कंपन्यांमधून मोठी नोकरकपात होण्याची भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Record Liquor Sale: वर्षभरात मद्याच्या दरात वाढ, तरीही तळीरामांनी एका वर्षात 5 अब्ज 'खंबे' रिचवले