(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian IT Industry: मंदीचा परिणाम! नव्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 40 टक्के नोकऱ्यांची घट?
Indian IT Industry: यंदाच्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Indian IT Industry: जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्यांमध्ये नोकर कपात केली जात आहे. यामध्ये अनेक भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. आर्थिक मंदीच्या सावटामुळे सुरू असलेल्या नोकरकपातीचा परिणाम कॅम्पस हायरिंगवर दिसून येत आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयटी सेक्टरमधील 40 टक्क्यांपर्यंत नोकऱ्यांची घट होण्याची शक्यता आहे. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. TeamLease च्या डेटाच्या आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय आयटी कंपन्या 40 टक्क्यांपर्यंत कमी भरती करू शकतात, असे TeamLease च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वर्ष 2023-24 मध्ये नोकर भरतीमध्ये घट होण्याचा अंदाज
TeamLease डेटानुसार, 2023 आर्थिक वर्षात, IT कंपन्यांनी एकूण 2.8 लाख लोकांची भरती केली आहे. त्याचबरोबर पुढील वर्षापर्यंत त्यात सुमारे 30 ते 40 टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाऊ शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येत्या काही दिवसांत कंपन्यांचा ग्रोथ रेट कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम क्षेत्रातील नोकरभरतीवर दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नोकरीत घट का होऊ शकते?
विशेष म्हणजे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मागील एक वर्ष चांगले राहिले नाही. आयटी कंपन्यांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आव्हाने वाढली आहेत, तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे अडचणी अनेक पटींनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत बदलती जागतिक परिस्थिती पाहता भारतीय आयटी कंपन्यांना कमीत कमी पैसा खर्च करायचा आहे. अशा परिस्थितीत त्याचा खर्च कमी करण्यासाठी नवीन भरती कमी करू शकते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक नोकरकपात
'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या आयटी सेक्टरमध्ये या वर्षी एकूण 3 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. layoffs.fyi. च्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, 500 हून अधिक आयटी कंपन्यांनी 1.5 लाखांहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे.
गेल्या काही महिन्यांत मोठ्या कंपन्यांमध्ये झालेल्या नोकरकपातीमुळे भारतातील किमान 36,400 बेरोजगार झाले आहेत. दुसरीकडे, 2022 मध्ये एकूण 1.6 लाख लोकांना टेक कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले. यामध्ये ट्विटर, मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आदी मोठ्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.