भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्येच जपानला मागं टाकणार, वर्ष संपण्याअगोदर चौथ्या स्थानावर पोहोचणार,जर्मनीला कधी मागं टाकणार?
India : भारत 2025 मध्येच जपानला मागं टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनेल. भारतापुढं त्यानंतर जर्मनीचं आव्हान असेल.

नवी दिल्ली : भारताचा जीडीपी 2025 मध्ये जपानला मागं टाकेल, त्यामुळं भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जारी करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुक एप्रिल 2025 मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार भारताचा नॉमिनल जीडीपी वाढून 4187.017 अब्ज डॉलर होईल. दुसरीकडे जपानच्या जीडीपीचा आकार 4186.431 अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज आहे.
भारत सध्या जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था आहे. जीडीपीमध्ये भारतापुढं अमेरिका, चीन, जर्मनी, जपान हे देश आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार येत्या काही वर्षांमध्ये भारत जर्मनीला पिछाडीवर टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार करेल. त्यावेळी भारताच्या जीडीपीचा आकार 5069.47 अब्ज डॉलर्स असेल. त्याचवेळी 2028 मध्ये भारताचा जीडीपी 5584.476 अब्ज डॉलर्स असेल. त्यावेळी जर्मनीच्या जीडीपीचा आकार 5251.928 अब्ज डॉलर्स इतका असेल.
भारताचा जीडीपी विकास दर किती राहणार?
आयएमएफच्या अंदाजानुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था अमेरिका आणि चीन हे दोन देश येत्या दहा वर्षांपर्यंत त्यांचं स्थान कायम ठेवू शकतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 2025 साठी भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्के इतका केला आहे. जानेवारीच्या आउटलूक रिपोर्टमध्ये हा अंदाज 6.5 टक्क्यांवर होती.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात विकास दरामधील घसरणीचं कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लावण्यात येत असलेल्या टॅरिफमुळं निर्माण होत असलेली अनिश्चितता हे आहे. आयएमएफच्या रिपोर्टनुसार भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. येत्या दोन वर्षात भारताची अर्थव्यवस्था एकमेव असेल जी 6 टक्के विकास दरानं वाढत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपीनाथन यांनी म्हटलं की, एप्रिल 2025 च्या वर्ल्ड इकोनॉमिक आउटलूकमध्ये 2.8 टक्के जागतिक विकासदराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामध्ये 127 देशांच्या विकास दरातील घसरणीचा समावेश आहे. जो जागतिक जीडीपीचा 86 टक्के वाटा आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिलला अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के केला आहे. जागतिक बँकेनं 6.3 टक्के केला आहे. त्यानंतर मूडीजनं देखील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 6.3 टक्के केला आहे.
जागतिक आर्थिक धोरणांशी संबंधित अनिश्चिततेचा परिणाम ग्राहक, व्यापार आणि आर्थिक घडामोडींवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात येणाऱ्या टॅरिफचा जगभरातील अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होणार आहे.
























