मोठी बातमी! साखरेच्या उत्पादनात 11 टक्क्यांची घट, दरात वाढ होणार; उत्पादन घटण्याची कारणं काय?
साखर उत्पादनात (Sugar Production) जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, यावर्षी देशातील साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे.
Sugar Production: भारत (India) हा जगात साखरेचा मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. साखर उत्पादनात (Sugar Production) जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, यावर्षी देशातील साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या देशात साखरेचे दर वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच, साखरेचं उत्पादन कमी झाल्यानं भविष्यात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
भारतातील साखरेचे उत्पादन 11 टक्क्यांनी घटलं
यंदाच्या साखर विपणन वर्षात 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत भारतातील साखरेचे उत्पादन 11 टक्क्यांनी घटलं आहे. साखरेचं 74.05 लाख टन उत्पादन झाले आहे. ही घट वार्षिक आधारावर दिसून आली आहे, म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत साखरेचे उत्पादन 82.95 लाख टन होते.
साखर उत्पादनात घट होण्याची कारणे कोणती?
देशातील साखर उत्पादनात घट होण्यामागे यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कमी उत्पादन हे प्रमुख कारण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. तसेच यावर्षी पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. अनेक ठिकाणी ऊस पट्ट्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळं ऊस उत्पादनात घट झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, साखर विपणन वर्ष 2023-24 मध्ये 15 डिसेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन 74.05 लाख टन होते. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.9 लाख टन कमी आहे. टक्केवारी पाहिल्यास त्यात 11 टक्क्यांची घट दिसून येते.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने उशिरा सुरु
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, यावर्षी, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 दिवस उशिरा सुरू झालेत. चालू कारखान्यांची संख्या वार्षिक आधारावर केवळ 497 आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन किती घटले
1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या साखर वर्षात महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 33.02 लाख टनांवरुन 24.45 लाख टनांवर घसरले आहे. कर्नाटकातील उत्पादन 19.20 लाख टनांवरून 16.95 लाख टनांवर घसरले आहे.
यूपीमध्ये साखरेचे उत्पादन वाढले
2023-24 च्या साखर उत्पादन विपणन वर्षात, उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन 22.11 लाख टन झाले आहे. तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत ते 20.26 लाख टन होते. 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे
ISMA ने गेल्या आठवड्यात अंदाज वर्तवला होता की विपणन वर्ष 2023-24 मध्ये एकूण साखर उत्पादन 325 लाख टन (इथेनॉलचा वापर न करता) अपेक्षित आहे. देशात साखरेचा 56 लाख टन साठा असून 285 लाख टन वापराचा अंदाज आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारने चालू पणन वर्षात साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली नाही. भारताने 2022-23 या विपणन वर्षात 64 लाख टन साखर निर्यात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या: