Mahindra & Mahindra : भारत-कॅनडामध्ये तणाव: उद्योजक आनंद महिंद्रांकडून कॅनडातील कंपनी बंद करण्याचा निर्णय
India Canada Tension : भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावादरम्यान उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅनडाच्या उद्योगक्षेत्राला धक्का दिला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामध्ये वाढत (India Canada Tension) असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती कंपनीने आज भारतीय शेअर बाजाराला दिली.
महिंद्र अँड महिंद्राची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये 11.18 टक्के भागीदारी आहे. कंपनीने स्वेच्छेनं कंपनीचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली.
रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून 20 सप्टेंबर रोजी सर्टिफिकेट ऑफ डिझॉल्युशन मिळालं आहे, अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. लिक्विडेशन नंतर, कंपनीला अंदाजे 28.7 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंडियन अकाउंटिंग स्टॅर्ण्डनुसार 20 सप्टेंबर स 2023 पासून आता कॅनडातील भागिदारीसोबत काही संबंध नसल्याचे महिंद्रा अॅण्ड महिंद्राने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता व्यवसायावर दिसू लागला आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहारावर या घटनेचा परिणाम दिसून आला. बाजारात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 3.11 टक्क्यांची म्हणजे 50.75 रुपयांची घसरण दिसून आली. आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचा शेअर 1583 रुपयांवर स्थिरावला.
महिंद्रा अँड महिंद्राच्या या निर्णयामुळे कॅनडाला मोठा धक्का बसला आहे. कॅनडा पेन्शन फंडाने अनेक भारतीय कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सार्वजनिक असलेल्या माहितीनुसार, सहा भारतीय कंपन्यांमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्वेस्टमेंट
फंडच्या गुंतवणुकीचे मूल्य 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कंपन्यांमध्ये Zomato, Paytm, Indus Tower, Nykaa, Kotak Mahindra Bank, Delhivery यांचा समावेश आहे.
कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले की, "कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या निषेध केलेले द्वेषपूर्ण गुन्हे, गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तेथील सर्व भारतीय नागरिकांनी आणि प्रवासाचा विचार करणार्यांना जास्तीत जास्त काळजी घ्यावी." तसेच "अलीकडील काळात विशेषतः भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्या भारतीय समुदायाच्या वर्गांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना अशा घटना पाहिल्या गेलेल्या कॅनडातील प्रदेश आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.