भारतात श्रीमंत लोकांची संख्या वाढली! नेमकी किती आहे अब्जाधिशांची संख्या? काय सांगतो अहवाल?
भारतातील श्रीमंत लोकांची संख्या (India Billionaire List) दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँकच्या अहवालात (Knight Frank reports) याबाबतची माहिती दिली आहे.
India Billionaire List : भारतातील श्रीमंत लोकांची संख्या (India Billionaire List) दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँकच्या अहवालानुसार (Knight Frank reports), भारतात 83 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्यांची संख्येत गेल्या वर्षी 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील 85,698 लोकांची संपत्ती ही 83 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2023 मध्ये ही संख्या 80,686 होती.
अब्जाधीशांची लोकांची संख्या वाढली
नाइट फ्रँकचा अंदाज आहे की 2028 पर्यंत भारतात श्रीमंत लोकांची संख्या ही 93,753 पर्यंत वाढेल. ही वाढ भारताचा मजबूत आर्थिक विकास दर, गुंतवणुकीच्या वाढत्या संधी आणि लक्झरी मार्केटचा विस्तार दर्शवते. भारतातील HNWI ची संख्या 2024 -25 मध्ये 85,698 पर्यंत पोहोचली आहे. जी 2023 च्या तुलनेत 6 टक्के अधिक आहे. ही संख्या 2028 पर्यंत 93,753 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. करोडपतींशिवाय अब्जाधीशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. 2024 मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या 191 पर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी 26 नवीन अब्जाधीश निर्माण झाले होते, तर 2019 मध्ये ही संख्या फक्त 7 होती. भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलर (सुमारे 79 लाख कोटी रुपये) आहे. ही आकडेवारी भारताला जगात तिसऱ्या क्रमांकावर आणते. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे ($5.7 ट्रिलियन) आणि चीन दुसऱ्या स्थानावर आहे ($1.34 ट्रिलियन).
श्रीमंतांची संख्या वाढण्याचं कारण काय?
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांच्या मते, भारतातील श्रीमंतांची वाढती संख्या देशाची आर्थिक ताकद आणि दीर्घकालीन वाढ दर्शवते. उद्योजकता, जागतिक एकत्रीकरण आणि नवीन उद्योगांमुळे भारतात एचएनडब्ल्यूआयची संख्या वाढत आहे. याशिवाय भारतातील श्रीमंतांच्या गुंतवणुकीचे प्राधान्यक्रमही बदलत आहेत. आता रिअल इस्टेटपासून ग्लोबल इक्विटीपर्यंत विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करत आहेत.
जगातील अब्जाधीशांची संख्या
जगभरात अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे लोक इतकी संपत्ती जमा करतात की त्यांची संपत्ती अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार 2024 मध्ये जगभरातील 78 देशांतील 2,781 अब्जाधीश होते. यामध्ये सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेत आहेत, तर भारताने या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. दरम्यान, देशात दिवसेंदिवस श्रीमंत लोकांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला गरीब लोकांच्या संख्येतही वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
अब्जाधीशांची नवी क्रेझ! काही जणांची 100 कोटींची तर काही जणांची हजारो कोटींची घर, भारतातील सर्वात महागडी घरं कोणती?
























