India at 2047 Summit: भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार सामंजस्य करार, एबीपीच्या मंचावरुन नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा
India at 2047 Summit: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एबीपी न्यूजच्या India at 2047 Summit या कार्यक्रमात मोठी घोषणा केली.

India at 2047 Summit: एबीपी नेटवर्कचा विशेष कार्यक्रम India@2047 SUMMIT मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी भारत -ब्रिटन मुक्त व्यापार करारासंदर्भात मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी म्हणाले की या कार्यक्रमात येण्यापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा सुरु होती. नरेंद्र मोदी म्हणाले, मला तुम्हाला सांगायचं आहे की भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार निश्चित झाला आहे.
मुक्त व्यापार करार का महत्त्वाचा
भारत आणि ब्रिटन यांनी ऐतिहासिक पाऊल टाकत मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी हा करार गेमचेंजर असल्याचं म्हटलं आहे. या करारामुळं दोन्ही देशाच्या लोकांना आणि व्यापाराला थेट फायदा होईल. यामध्ये नोकरीच्या संधी असतील, गुंतवणूक वाढणं असेल किंवा वस्तू किंवा सेवांच्या किमती कमी होणं, असे फायदे होऊ शकतात.
Delighted to speak with my friend PM @Keir_Starmer. In a historic milestone, India and the UK have successfully concluded an ambitious and mutually beneficial Free Trade Agreement, along with a Double Contribution Convention. These landmark agreements will further deepen our…
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2025
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचं ट्विट
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देखील मुक्त व्यापार करारावर ट्वीट करत म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्व आणि प्रेरणेतून भारतानं एक ऐतिहासिक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचं म्हटलं आहे. हा करार केवळ व्यापार नव्हे तर, नाविन्यता, नोकरी आणि विकसित भारताच्या दिशेनं पुढं जाण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.
ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाची प्रतिक्रिया
ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाकडून देखील मुक्त व्यापार करारावर प्रतिक्रिया आली आहे. यूरोपियन यूनियनच्या बाहेर आल्यानंतरचं सर्वात मोठं व्यापारासंदर्भातील यश असल्याचं म्हटलं. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ब्रिटननं म्हटलं की हा करार ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी अब्जावधी पाऊंड जोडेल. लोकांचे पगार वाढतील. आमच्या प्लॅन फॉर चेंज धोरणाला मजबुती मिळेल. भारतासोबत करण्यात आलेला हा करार आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वांकाक्षी असल्याचं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियामुळं भारतात कंटेट क्रिएशन वाढल्याचं सांगितलं. आज गावात जेवण बनवणाऱ्या महिलेच्या कोट्यवधी सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबनं भारताच्या कंटेंट क्रिएटर्सना गेल्या तीन वर्षात 21000 कोटी रुपये दिल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग सेक्टरसंदर्भात म्हटलं की आमच्या सरकारनं अनेक निर्णय घेतले, जे कित्येक दशकांपासून प्रलंबित होते. ते राजकीय इच्छाशक्तीमुळं डब्यामध्ये बंद झाले होते. बँकिंग क्षेत्र अर्थव्यवस्थेचा आधार असतो. यापूर्वी असे समिट व्हायचे नाहीत ज्यामध्ये बँकांच्या तोट्याबाबतच्या चर्चेशिवाय ते व्हायचे. 2014 च्या अगोदर बँका बर्बाद होण्याच्या वाटेवर होत्या. आज भारतातील बँकिंग क्षेत्र जगातील सर्वात मजबूत बँकिंग सेक्टर असल्याचं मोदी म्हणाले.
























