Hyundai India IPO:पैसे तयार ठेवा, ह्युंदाईचा सर्वात मोठा आयपीओ येणार,एलआयसीचं रेकॉर्ड मोडणार, सेबीकडून प्रस्ताव मंजूर
Biggest IPO in Indian Market: दक्षिण कोरियाची वाहन कंपनी असलेल्या ह्युंदाईचा भारतातील स्थानिक यूनिटचा आयपीओ लवकरच येणार आहे. सेबीनं ह्युंदाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून आयपीओची जोरदार चर्चा आहे. प्रिमियम एनर्जीज, यूनिकॉमर्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, पीएनजी ज्वेलर्स यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. प्रीमियम एनर्जीज, यूनिकॉमर्स, बजाज हाऊसिंग फायनान्स यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. सध्या शेअर मार्केटमध्ये दर आठवड्याला नवे आयपीओ येत आहेत, त्यामुळं गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळतेय. एलआयसीच्या आयपीओचं रेकॉर्ड ह्युंदाईच्या आयपीओच्या लाँचिंगवेळी तुटण्याची शक्यता आहे. या कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ लवकरच शेअर बाजारात ओपन होईल.
सेबीकडून प्रस्ताव मंजूर
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, ह्युंदाईचा आयपीओ लवकरच येणा आहे. ह्युंदाई इंडिया कंपनीच्या आयपीओच्या प्रस्तावाला सेबीनं मंजुरी दिली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनं सूत्रांच्या हवाल्यानं दावा केला आहे. मात्र, अद्याप सेबी किंवा ह्युंदाई कंपनीनं याबाबत अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
ह्युंदाई इंडिया ही भारतीय वाहन बाजारातील तीन प्रमुख कंपन्यापैकी एक आहे. भारतीय शेअर बाजारात आयपीओ आणण्यासाठी ह्युंदाई कंपनीनं तीन महिन्यांपूर्वी सेबीकडे प्रस्ताव दिला होता. ह्युंदाईनं आयपीओचे मॅनेजर म्हणून जेपी मॉर्गन, सिटी ग्रुप, एचएसबीसी या बँकर्सची निवड केली आहे.
ह्युंदाईचा आयपीओ 25 हजार कोटींचा?
रॉयटर्सच्या काही महिन्यांपूर्वीच्या एका रिपोर्टमध्ये ह्युंदाईच्या आयपीओ 25 हजार कोटी रुपयांचा असू शकतो. आतापर्यंत भारतातील शेअर मार्केटमधील सर्वात मोठा आयपीओ मे 2022 मध्ये आला होता. एलआयसीचा आयपीओ 21 हजार कोटी रुपयांचा होता. ह्युंदाईचा आयपीओ आल्यास एलआयचीसा विक्रम मोडला जाईल.
कार उत्पादक कंपनीचा आयपीओ 2 दशकानंतर
ह्युंदाई इंडिया कंपनीचा प्रस्तावित आयपीओ 30 अब्ज डॉलर्सच्या किमतीपर्यंत जाऊ शकतो. भारतीय शेअर बाजारात कार उत्पादक कंपनीचा आयपीओ दोन दशकानंतर येत आहे. मारुती सुझुकीचा आयपीओ 2003 मध्ये शेअर मार्केटमध्ये आला होता.ह्युंदाईच्या जागतिक व्यवसायात भारतातील व्यवसाय महत्त्वाचा आहे. अमेरिका, दक्षिण कोरियानंतर सर्वाधिक उत्पन्न भारतातून ह्युंदाईला मिळतं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :
आणखी एका आयपीओमुळे गुंतवणूकदारांचे खिसे फुल्ल! सूचिबद्ध होताच दिले दमदार रिटर्न्स!