Hardeep Singh Puri: आपण अंदमान समुद्रात मोठ्या तेलसाठ्याचा शोध लागण्याच्या उंबरठ्यावर, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे मोठे वक्तव्य
Hardeep Singh Puri: भारत सध्या एकूण वापरापैकी 85 टक्के खनिज तेलाची आयात करतो. अमेरिका आणि रशियानंतर खनिज तेल आयातीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गयानातील तेल साठ्यासारखा तेलसाठ्याचा शोध अंदमानमध्ये लावण्याच्या जवळ भारत पोहोचला आहे, असं केंद्रीय मंत्री म्हणाले. अंदमान समुद्रात तेलसाठा सापडल्यास तो 184440 कोटी लिटर्स क्रूड ऑईलचा असू शकतो. यामुळं भारताची अर्थव्यवस्था 20 ट्रिलियन डॉलर्सची होईल, असं वक्तव्य हरदीपसिंग पुरी यांनी द न्यू इंडियन सोबत बोलताना व्यक्त केलं.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक भीती क्रूड ऑईलच्या किमती वाढण्याची आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आली नाही तर क्रू़ड ऑईलचे दर प्रति बॅरल 150 डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. यामुळं भारतासारख्या क्रूड ऑईलची आयात करणाऱ्या देशाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं एक वक्तव्य चर्चेत आहेत. अंदमान समुद्रात मोठा तेलसाठा भारताच्या हाती लवकरच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. यासंदर्भातील खोदकाम सुरु असल्याचंही ते म्हणाले.
भारताकडून सध्या जवळपास 85 टक्के कच्चे तेल विविध देशांकडून आयात केली जाते. रशिया आणि आखाती देशांकडून भारत आयात करतो. अमेरिका, रशियानंतर भारत आयातीच्या बाबत तिसऱ्या स्थानावर आहे.
केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी खनिज तेलाच्या साठ्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा खरा ठरल्यास भारताचं खनिज तेल आयाती संदर्भातील अवलंबित्व कमी होईल. भारत अंदमान समुद्रात एका मोठ्या खनिज तेल साठाच्या शोधाच्या उंबरठ्यावर असल्याचं पुरी म्हणाले.
पेट्रोलियम मंत्र्यांनी या तेल साठ्यांची तुलना गयानातील हेस कॉर्पोरेशन आणि सीएनओओसीमधील तेल साठ्यांसोबत केली. जर अंदमान समुद्रात गयाना सारखा तेलसाठा मिळाला तर भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्य दिशेनं पाऊल टाकेल. यामुळं निर्यात आणि आर्थिक विकासाच्या वेगाला गती मिळू शकते. गयानामधील तेल साठा जगातील खनिज तेलांच्या बाबतीत 17 व्या स्थानावर आहे. जिथं 11.6 अब्ज बॅरल तेल आणि गॅसच्या साठ्यांचा अंदाज आहे.
अर्थव्यवस्था 20 ट्रिलियनची होणार
पुरी यांच्या मते गयानासारखे तेल साठे भारताला सापडल्यास देशाची अर्थव्यवस्था 3.7 ट्रिलियन डॉलर्सवरुन 20 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते. भारतीय तेल उद्योगासाठी अंदामनमधील तेल साठ्यांचा शोध गेमचेंजर ठरू शकतो. यामुळं भारत खनिज तेल आयातदार देश ही ओळख पुसली जाईल. जागतिक ऊर्जा क्षेत्रात भारताला नवी ओळख मिळू शकते.
























