DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, मोदी सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
July DA Hike News: वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह महागाई भत्ता दिला जातो. त्यामध्ये एका वर्षात दोन वेळा सुधारणा केली जाते.

July DA Hike News: केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा होऊ शकते. केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवून देण्याची शक्यता आहे. यामुळं महागाई भत्ता 55 टक्क्यांवरुन वाढून 59 टक्के होऊ शकतो.
मे 2025 मध्ये औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठी All India Consumer Price Index for Industrial Workers (AICPI-IW) 0.5 अंकांनी वाढून 144 वर पोहोचला आहे. मार्चमध्ये हा निर्देशांक 143 पर्यंत आहे. एप्रिलमध्ये143.5 वर होता. या मुळं महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर निर्देशांक वाढत राहिला तर 144.5 वर गेला तर एआयसीपीआय- आय डब्ल्यू चं 12 महिन्यांची सरासरी जवळपास 144.17 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
AICPI-IW निर्देशांकाचा वापर कशासाठी होतो?
सरकारकडून AICPI-IW निर्देशांक महागाईला ट्रॅक करण्यासाठी, महागाई भत्ता ठरवण्यासाठी किंवा धोरण बनवण्यासाठी केला जातो. AICPI-IW वाढल्यास औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा खर्च वाढू शकतो. महागाई भत्ता वाढवून त्याचं समन्वय निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. महागाई भत्ता जानेवारी आणि जुलै महिन्यात बदलला जातो. महागाई भत्ता गेल्या बारा महिन्यांच्या एआयसपीआय-आयडब्ल्यूच्या सरासरीवर आधारीत असतो.
महागाई भत्ता वाढल्यास किती फायदा होणार?
महागाई भत्ता वाढवल्याचा थेट परिणाम मूळ वेतनावर होतो. याशिवाय पीएफ आणि ग्रॅच्युटी देखील वाढते. जर तुमचं मूळ वेतन 18000 हजार रुपये आहे आणि महागाई भत्ता 55 टक्क्यांवरुन वाढून 59 टक्के केल्यास महागाई भत्ता म्हणून 10620 रुपये मिळतील. सध्या महागाई भत्ता 9900 रुपये मिळतो. म्हणजेच दरमहा 720 रुपये वाढू शकतात.
महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यास किती महागाई भत्ता मिळेल हे लक्षात येईल. जर मूळ वेतन 50000 रुपये असेल तर 59 टक्के महागाई भत्ता पकडल्यास 29500 रुपये मिळतील. सध्या 55 टक्क्यांनुसार महागाई भत्ता 27500 रुपये इतका मिळतो.
केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवल्यास केंद्र सरकारकच्या विविध आस्थापनांमधील कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारक यांना फायदा होऊ शकतो. महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढल्यास कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
महागाई भत्ता वाढीची घोषणा कधी होणार?
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी महागाई भत्ता वाढीची घोषणा सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान केली होती. त्यामुळं यंदा देखील त्याच दरम्यान महागाई भत्ता वाढी संदर्भातील घोषणा केली जाऊ शकते. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे. त्यामुळं सातव्या वेतन आयोगाद्वारे मिळणारा महागाई भत्ता हा अखेरचा ठरणार आहे. केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र, समिती, कामकाज याबाबत अद्याप अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत.























