Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत, जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी वर्ग
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आता जून महिना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय कडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वळविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. आता जून महिना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय कडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.
जीआरमध्ये काय म्हटलंय?
1."मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-3, 2235-सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाजकल्याण, 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (02) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (02) (01) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (कार्यक्रम) 31-सहायक अनुदाने (वेतनेतर) (2235डी767) या लेखाशिर्षाखाली रु.3960.00 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.
2. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.07.04.2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी (2235डी767) या लेखाशिर्षाखाली रु.410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
3. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला वबाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.
4. विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलाना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.
5. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करतांना विभागप्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.7.4.2025 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.
6. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.7.4.2024 च्या परिपत्रकान्वये निर्णयान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क.626/2025/व्यय-14, दि.26.06.2025 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती
महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता.
आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16500 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ज्या महिला पहिल्या पासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल.
'या' लाडक्या बहिणींना मिळतात 500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जीआर नुसार 500 रुपये मिळतात. शासनाचं धोरण डीबीटीवरुन एका लाभार्थ्याला एका वर्षात 18000 रुपये मिळावं हे असल्यां दोन्ही योजनांचे मिळून 12 हजार मिळतात त्यामुळं उर्वरित 6000 रुपये दरमहा 500 रुपयांप्रमाणं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा संख्या 7 ते 8 लाखांच्या दरम्यान आहे.






















