(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनं खरेदी करावं की नको! सुवर्ण नगरीत सोन्याला विक्रमी झळाळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात प्रतितोळा 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे प्रतितोळा 66700 वर गेला आहे.
Jalgaon Gold Price : दिवसेंदिवस सोनं (Gold) खरेदी करणं कठीण झालं आहे. कारण सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात प्रतितोळा 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे प्रतितोळा 66700 वर गेला आहे. तर जीएसटीसह (GST) सोन्याचा दर 68700 इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.
गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली
अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात प्रतीतोळा एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचे दर 66700 रुपयांवर आहेत. तर जी एस टी सह हेच दर 68700 रुपये इतक्या उंचीवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी काळात अजूनही सोन्याचा दरात वाढ होण्याचे संकेत सोने व्यावसायिकांनी दिले आहे.
नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री
सोनं चांदी महाग झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. सध्या देशात लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. पण सध्या सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळं अनेक लोक सोने चांदीची खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. दरम्यान, बाजारात सोन्या चांदीला असणारी मागणी आणि होणारा पुरवठा यावर दराचे गणित ठरवले जाते. सध्या सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मागणीत वाढ झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालेला दिसत आहे.
जागतिक बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ
दरम्यान, एकीकडे जळगाव बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असताना, दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. जागतिक बाजारात प्रति दहा ग्राम सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 66 हजार 700 च्या घरात गेले आहेत. जागतिक बाजारात देखील सोन्याची मागणी वाढती दरांवर परिणाम करत असल्याचं चित्र दिसत आहे. या सोन्याच्या वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येत आहे.
महत्वाच्या बातम्या: