सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी; 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत; प्रतितोळ्याचा दर 57 हजारांच्या आसपास
Gold Rate Hike Today: इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा झाला आहे.
Gold Rate Hike Today: जगावर आर्थिक मंदीचं (Financial Crisis) सावट घोंगावतंय, तसेच, भारतालाही मंदीची (Recession) झळ सोसावी लागणार असल्याचं वारंवार अर्थतज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. यामुळे आधीपासूनच महागाईच्या (Inflation) गर्तेत अडकलेला माणूस आणखी पिचला गेला आहे. अशातच आता माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी. सोन्याच्या दरांत (Gold Rate Hike) उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर 56 हजारांवरुन थेट 57 हजारांच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनंच झाली आहे. एकीकडे मंदीचे सावट आहे, तर दुसरीकडे सोनं दिवसेंदिवस वधारत आहे. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसें-दिवस वाढत चालली आहे. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होतं. मात्र इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा झाला आहे. अशा प्रकारे सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः गेल्या 5 वर्षांत सोनं झपाट्यानं वाढलं आहे. तसेच, गेल्या 9 महिन्यांत तर सोन्याचं दर दुप्पटीनं वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणं हळूहळू आवाक्याबाहेर जात आहे. दुसरीकडे US फेड आपल्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोन्यावर होऊ शकतो. त्यामुळे सोन्याची किंमत पुन्हा वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
येत्या काळात तुम्ही सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याची शुद्धता तपासणं गरजेचं असतं. तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदीचा विचार करत असाल तर, 24 कॅरेट सोनंच खरेदी करा. कारण दागिन्यांसाठी 22, 21, 20, 18 कॅरेट शुद्धतेमध्ये दागिने तयार केले जातात.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.