Gold Price: व्यापाऱ्यांची भीती अखेर खरी ठरली, सोनं महागलं, गुढीपाडव्यापूर्वी प्रतितोळा दर 75 हजारांचा दर गाठणार?
Gold price in market: सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सध्या झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 75 हजार रुपये मोजावे लागू शकतात. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव वाढल्याने चिंता वाढल्या.
मुंबई: भारतात लग्नसराई आणि सणासुदीच्या प्रसंगांवेळी सोन्याचे दागिने आणि वस्तू खरेदी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात किंवा पवित्र मुहूर्तांवर सोन्याचा दर वाढणे, ही बाब नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर (Gold Rates) झपाट्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमतीने सोमवारी नवा उच्चांक गाठला. ही परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर 75 हजार रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करण्याच्या बेतात असलेल्या सामान्य नागरिकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. वायदे बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर 69,487 रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर जीएसटीसह 68700 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर पुण्यात सोन्याच्या प्रतितोळा दराने जीएसटीची रक्कम पकडून 70843 रुपयांचा स्तर गाठला. यापूर्वी 26 मार्चला सोन्याचा प्रतितोळा दर 66420 रुपये इतका होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याची किंमत इतक्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत.
सोने खरेदीसाठी गुढीपाडवा हा शुभमुहूर्त समजला जातो. येत्या 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्यामुळे या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढणार, हे जवळपास निश्चित आहे. परंतु, सध्या 70 हजारांच्या आसपास असलेल्या सोन्याचा प्रतितोळा दर गुढीपाडव्यापर्यंत 75 हजारांवर जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सोनं इतक्या वेगाने का महागलं?
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून आगामी काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढत आहेत. हाच पॅटर्न भारतामध्येही पाहायला मिळत आहे. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी केल्यास सोन्याची किंमत वाढेल, असा अंदाज अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. तसेच रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. अस्थिर काळात गुंतवणूकदार भांडवली बाजारापेक्षा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या सगळ्यामुळे 2024 च्या अखेरपर्यंत सोने 75 हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र, आता एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 75 हजारांच्या पातळीच्या नजीक पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी किती वाढणार, याची चिंता अनेकांना लागून राहिली आहे.
आणखी वाचा
जयललितांच्या 27 किलो सोनं अन् डायमंडवर कोणाचा अधिकार? तमिळनाडू सरकारला कर्नाटक हायकोर्टाचा झटका!