(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold : कोण म्हणतोय भारत गरीब आहे; भारतीयांकडे जगातील सर्वाधिक सोने!
Gold In World: भारतात जगातील सात देशांपेक्षा भारतात सर्वाधिक सोने असल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे.
Gold In World: भारत हा जगातल्या श्रीमंत देशातील एक आहे अस जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कोन्सिलने नुकताच जो काही अहवाल सादर केला आहे तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहे असं म्हणता येणार आहे. जागतिक बाजारपेठेत सोने बाजारपेठ आणि व्यवसाय यांच्यासाठी वर्ल्ड गोल्ड कौन्सिल ही संस्था एक महत्त्वाची संस्था आहे.
या संस्थेने काही वर्षातील सोने बाजारपेठचा अभ्यास करून त्याचा नुकताच अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतीयांकडे जगातील अकरा टक्के सोने आहे. आकडेवारीनुसार, 21733 टन सोने भारतात आहे. या सोन्याच्या किंमतीचा विचार केला तर भारतावर असलेल्या कर्जाच्या रक्कमेपेक्षाही अधिक रक्कम होऊ शकते. भारत जरी गरीब किंवा विकसनशील देश मानला जात असला तरी भारतीयांकडे असणाऱ्या सोन्याचा विचार करता भारत जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणत भारतात सोने असल्याची अनेक कारणे आहेत. भारतात विविध सण, परंपरा आणि लग्न समारंभात सोन्याचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे सातत्याने अनेकजण विविध कारणांनी सोन्याची दागिने खरेदी करत असतात. त्याशिवाय, सोन्याचे दागिने खरेदी करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्यामुळेच सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे समाजातील सर्वच स्तरांमध्ये सोने खरेदीकडे ओढा असल्याचे दिसून येते. बदलत्या काळातही ही सोन्याचे आकर्षण आजही कमी झालेले नसल्याने भारतीय महिलांजवळ हजारो कोटी रुपयांच्या सोन्याची साठवणूक झाली असल्याचे म्हटले जाते.
सोन्याच्या साठ्यात देशभरात वाढ होत राहिली असल्याने भारत जगातील सात प्रगत देशांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही पुढे असल्याचं दिसून येत असल्याचा अहवाल वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिला आहे. अमेरिका (8133), जर्मनी (3382), इटली (2451), फ्रान्स (2436), रशिया (2298), चीन (1948) सिंगापूर (127) टन इतका सोन्याचा साठा या सातदेशांजवळ आहे. या सातही देशांच्या सोन्याच्या साठ्याची आकडेवारी एकत्र केली तरी भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती कमीच आहे.