(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indo-EU Trade : भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार वाटाघाटीला नऊ वर्षानंतर सुरुवात, 27 जूनला दिल्लीत पहिली फेरी
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार वाटाघाटीला नऊ वर्षानंतर सुरुवात तब्बल नऊ वर्षानंतर सुरुवात झाली आहे.
Indo-EU Trade : भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार करारासाठी दोन्ही बाजूंनी वाटाघाटीला 9 वर्षानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. ब्रसेल्स येथे ईयूच्या मुख्यालयात एका संयुक्त कार्यक्रमात पीयूष गोयल आणि युरोपिअन कमिशनचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्डीस डोम्बरोव्स्कीस यांनी गुंतवणूक संरक्षण करार आणि जीआय करारासाठीच्या वाटाघाटींची घोषणा केली. वाटाघाटींची पहिली फेरी नवी दिल्ली येथे 27 जून रोजी सुरु होणार आहे. ईयू हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असल्यानं भारतासाठी हा मुक्त व्यापार करार महत्त्वपूर्ण असमार आहे. भारत-ईयू वस्तू व्यापाराने 2021-22 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.5 टक्क्यांची वाढ नोंदवत 116.36 अब्ज डॉलर व्यापाराचा उच्चांक गाठला आहे.
ब्रसेल्स इथे ईयूच्या मुख्यालयात झालेल्या एका संयुक्त कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपिअन कमिशनचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्डीस डोम्बरोव्स्कीस यांनी औपचारिकरीरत्या भारत-युरोपीय महासंघा दरम्यानच्या FTA अर्थात मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटींचा प्रारंभ केला. त्याचप्रमाणे, गुंतवणूक संरक्षण करार आणि GI अर्थात भौगोलिक निर्देशक करारासाठीच्या वाटाघाटींची सुरुवातही यावेळी करण्यात आली. युरोपीय कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन देर लेयेन यांची एप्रिल 2022 मधील दिल्लीत भेट दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला युरोप दौरा यामुळे FTA विषयक चर्चेला गती आली आहे. वाटाघाटींचा सुस्पष्ट आराखडा तयार होण्यास मदत झाली आहे.
व्यापारी भागीदार म्हणून अमेरिकेचा पहिला तर युरोपीय महासंघाचा दुसरा क्रमांक
भारताचा व्यापारी भागीदार म्हणून अमेरिकेचा पहिला तर युरोपीय महासंघाचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळं, भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मुक्त व्यापार करारांमध्ये या FTA चा समावेश होतो. भारत-ईयू उत्पादित वस्तू व्यापाराने 2021-22 मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 43.5 टक्क्यांची वाढ नोंदवली असून 116.36 अब्ज अमेरिकी डॉलर व्यापाराचा उच्चांक गाठला. भारताकडून ईयूला होणारी निर्यात वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये 57 टक्क्यांनी वाढून 65 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यन्त पोहोचली आहे. भारताचा ईयूशी असणारा व्यापार सरप्लस स्वरुपाचा आहे.
व्यापार करारातून पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्य आणण्यास मदत
दोन्ही भागीदारांची पायाभूत मूल्ये सारखीच आणि हितसंबंध सामायिक आहे. खुल्या बाजारपेठेच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्येच दोन्हींचा समावेश होत असल्यानं, या व्यापार करारातून पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्य आणण्यास मदत होणार आहे. तसेच व्यापारामधील आर्थिक संधींना चालना मिळणार आहे. त्याचबरोबर दोन्हीकडील लोकांना या करारामुळं फायदा मिळणार आहे. या व्यापार वाटाघाटी व्यापक पायावर आधारित असाव्यात. समतोल साधणाऱ्या असाव्यात, सर्वंकष असाव्यात, तसेच संबंधांचा विचार करणाऱ्या असाव्यात, असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. एकमेकांच्या बाजरपेठांमध्ये शिरकाव करण्यातील अडचणींचा द्विपक्षीय व्यापारावर दुष्परिणाम यावर चर्चा अपेक्षित आहे.
व्यापारात हस्तकौशल्याच्या वस्तूसह शेतमालाचाही समावेश
प्रस्तावित IPA मुळे सीमापार गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आवश्यक चौकट तर मिळेलच, तसेच, गुंतवणूकदारांचा विश्वास उंचावण्यासही मदत होईल. GI करारामुळे पारदर्शक आणि साचेबद्ध असे नियामक वातावरण तयार होण्याची अपेक्षा आहे. जेणेकरुन GI उत्पादनांचा व्यापार करता येईल. या उत्पादनांमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू आणि शेतमालाचाही समावेश असेल. या तिन्ही करारांवरील वाटाघाटी समांतरपणे होऊन एकाचवेळी त्या समाप्त व्हाव्यात असा दोन्ही बाजूंचा इरादा आहे. तीनही करारांसाठी वाटाघाटींची पहिली फेरी नवी दिल्ली येथे 27 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे.
या वर्षात याआधी भारताने अतिशय कमी वेळात ऑस्ट्रेलिया आणि यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातींसोबतच्या मुक्त व्यापार करारांना अंतिम स्वरुप दिले आहे. कॅनडा आणि युनायटेड किंगडम यांच्याशीही FTA विषयक बोलणी सुरु आहेत. महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांशी संतुलित व्यापार करार करुन, विद्यमान व्यापार करारांना पुनरुज्जीवन देणे आणि त्यायोगे व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करणे या भारताच्या व्यापक धोरणाचा एक भाग म्हणून FTA वाटाघाटी महत्त्वाच्या ठरतात.