गुंतवणुकीतही सचिन तेंडुलकरचा सिक्सर! 'या' कंपनीत लावलेले पैसे झाले चार पट; मिळाले कोट्यवधी रिटर्न्स
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने गुंतवलेल्या एका कंपनीने चांगलीच प्रगती केली आहे. सचिनने गुंतवलेल्या पैशांचे मूल्य आता चार पट झाले आहे.
Multibagger Stock: मास्टर ब्लासर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कोण ओळखत नाही. त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. पण मैदानावर क्रिकेट खेळायचा तेव्हा तो धमाकेदार फलंदाजी करायचा. फलंदाजीदरम्यान तो चौकार, षटकार यांचा पाऊस पडत असे. सचिन तेंडुलकर जेवढा क्रिकेटमध्ये मास्टर आहे, तेवढाच तो गुंतवणुकीतही सजग आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आझाद इंजीनिअरिंग (Azad Engineering) या छोट्या कंपनीत गुंतवणूक केली होती. या कंपनीने आता आपला आयपीओ आणला आहे. त्यानंतर आता ही कंपनी मल्टिबॅगर ठरली आहे. यात सचिन तेंडुलकरचेही पैसे तब्बल चौपट झाले आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये आला होता आझाद इंजीनिअरिंगचा आयपीओ
आझाद इंजिनिअरिंग या कंपनीने आपला आयपीओ डिसेंबर 2023 आणला होता. त्यानंतर ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली होती. तेव्हा या कंपनीने आपल्या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईज बँड) 499 ते 524 रुपये प्रतिशेअर असा ठेवला होता. या आयपीओला तेव्हा 80 पटीने सबस्क्राईब करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य 720 रुपये तर मुंबई शेअर बाजारावर 710 रुपयांच्या मूल्यावर हा शेअर सूचिबद्ध झाला होता. शुक्रवारी शेअर बाजारावर हा शेअर 41 रुपयांनी वाढून थेट 1736 रुपयांवर पोहोचला.
सचिन तेंडुलकरने गुंतवले होते पाच कोटी रुपये
सचिन तेंडुलकरने या कंपनीत साधारण 5 कोटी रुपये गुंतवले होते. 2023 साली सचिनने या कंपनीचे एकूण चार लाख शेअर्स खरेदी केले होते. आज सचिनच्या याच पैशांचे मूल्य आज चारपट झाले आहे. आयपीओ आल्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे. फक्त सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरचे मूल्य 150 टक्क्यांनी वाढले आहे.
कंपनीचे बाजार भांडवल झाले 10280 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार आझाद इंजिनिअरिंग या कंपनीने गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी केलेली आहे. या कंपनीच्या शेअर्सनेही आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीत केलेल्या अल्प मुदतीच्या गुंतवणुकीतूनही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून या कंपनीचे बाजार भांडवल आता 10280 कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचा :
काय सांगता, आता सोन्याचा संपूर्ण देशात एकच भाव? लवकरच होणार मोठा बदल!
टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार?
प्राप्तिकर विभागाचा नाद नको! 1 रुपयासाठी नोटीस आली, घालवावे लागले तब्बल 50000 रुपये!