FII : विदेशी गुंतवणूकदारांकडून जुलैमध्ये विक्रीचा धडाका, भारताच्या इक्विटी मार्केटमधून FII चा काढता पाय, आकडेवारी समोर
FII : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात पुन्हा विक्री सुरु केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराला होत असलेला उशीर हे एक कारण आहे.

मुंबई : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या 15 दिवसांमध्ये 11778.03 कोटी रुपये काढून घेतले आहेत. मे महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जितकी खरेदी केली होती त्यापेक्षा जास्त रक्कम जुलैच्या 15 दिवसांमध्ये काढून घेतली आहे. मे महिन्यात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 11773.25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जुलै महिन्यात आतापर्यंत 11778.03 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2025 चा विचार केल्यास विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1.22 लाख कोटींच्या इक्विटीजची विक्री केली आहे.
Marcellus चे संस्थापक आणि सीआयओ सौरभ मुखेरजेआ यांनी उच्च मूल्यांकन आणि कमाई वाढीतील कमजोर संकेत यामुळं विदेशी गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.
विदेशी गुंतणूकदारांनी भारतीय बाजारातील इक्विटीजची विक्री करण्याचं प्रमुख कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारला होत असलेला उशीर होय. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीतील कमजोर निकाल आणि उच्च मूल्यांकन ही कारणं आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टची मुदत दिलेली आहे. ती मुदत जवळ येत असली तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर सहमती झालेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीय बाजारपेठेत कृषी आणि डेअरी क्षेत्रात प्रवेश हवा आहे. भारत मात्र त्यासाठी तयार नाही.
मार्केटचे अभ्यासक अरुण केजरीवाल यांनी देखील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीबाबत भाष्य केलं. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये निराशा असण्याचं कारण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी करारावर तोडगा न निघणं असल्याचं म्हटलं. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरु आहेत.
आर्थिक वर्ष 2025-26 मधील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होत आहेत. टीसीएस आणि एचसीएलनं भू राजकीय संघर्षामुळं त्यांचे करार पूर्ण होण्यात अडचणी आल्याचं सांगितलं आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमधील खरेदी केल्यानंतर आता विक्री सुरु केली आहे. शॉर्ट टर्ममध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न विदेशी गुंतवणूकदारांचा प्रयत्न आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
























