EPFO 3.0 Update लवकरच येणार, पीएफचे पैसे ATM वरुन काढता येणार, मोठी अपडेट समोर
EPFO 3.0 : ईपीएफओ 3.0 अपडेट पुढील वर्षी येणार आहे. त्यानुसार पीएफ खात्यातील रक्कम थेट एटीएम सेंटरवरुन देखील काढता येईल.
नवी दिल्ली : देशभरात खासगी क्षेत्रातील म्हणजेच संघटित क्षेत्रातील 6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार ईपीएफओमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. केंद्राकडून ईपीएफओच्या सबसक्राइबर्सना नवे लाभ देण्यासंदर्भात विचार केला जात आहे. यासाठी केंद्र सरकार ईपीएफओ 3.0 अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. प्राप्तिकर विभागानं देखील काही दिवसांपूर्वीच पॅन 2.0 ची घोषणा देखील केली आहे. आता ईपीएफओमध्ये देखील नवे बदल पाहायला मिळू शकतात.
ईपीएफओ 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 12 टक्क्यांपेक्षा रक्कम ईपीएफमध्ये गुंतवता येणार आहे. याशिवाय कर्मचारी त्यांच्या कमाईच्या क्षमतेप्रमाणं पीएफमध्ये योगदान देऊ शकतात, असा देखील बदल केला जाईल. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांना एटीएमचा वापर करता येईल, अशी सुविधा देखील नव्या अपडेटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार गांभीर्यानं ईपीएफओ 3.0 लागू करण्याची तयारी करत आहे. यामध्ये ईपीएफ सबस्क्रायबर्ससाठी नव्या घोषणा केल्या जाऊ शकतात. पीएफ खात्यात कर्मचाऱ्यांना योगदान देण्याची मर्यादा वाढवली जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करावी लागते, ती मर्यादा हटवली जाईल. यामुळं कर्मचारी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकतात.
या पर्यायाचा विचार कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिकाअधिक रक्कम गुंतवता यावी म्हणून केला जात आहे. यामुळं एखादा कर्मचारी पीएफमध्ये जितकी अधिक रक्कम गुंतवेल त्याप्रमाणात त्याला निवृत्तीवेळी अधिक पेन्शन मिळू शकेल. दुसरीकडे रोजगार देणाऱ्या कंपन्यांच्या योगदानामध्ये मात्र बदल केला जाणार नाही.
ईपीएफओ सबस्क्रायबर्ससाठी मोठी घोषणा सरकार करु शकतं ती म्हणजे डेबिट कार्ड प्रमाणं एक स्मार्ट कार्ड पीएफ खात्याशी संबंधित असं जारी केलं जाऊ शकतं.त्या स्मार्ट कार्डचा वापर करुन पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. मात्र, त्यावर मर्यादा असेल. पीएफ खात्यातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओ 3.0 अपडेट मे जून 2025 मध्ये लागू केलं जाऊ शकतं.
ईपीएफओकडील आयटी सिस्टीममध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना देखील कोणताही व्यवहार सोप्या प्रक्रियेनं करता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येईल. ईपीएफओ 3.0 च्या सुधारणा दोन टप्प्यात केल्या जाऊ शकतात. ईपीएफओ 2.0 नुसार सुधारणा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. ईपीएफओ 3.0 मे जून 2025 मध्ये पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती आहे.
इतर बातम्या :
ईपीएफओ नियमांमध्ये बदल होणार, अधिक पेन्शनसाठी केंद्र सरकारचं पाऊल, गिग वर्कर्सबाबत मोठा निर्णय घेणार