Share Market News Updates : सहा महिन्यात कमावले ते अडीच महिन्यात गमावले; गुंतवणूकदारांचे 26.50 लाख कोटी पाण्यात
Share Market News Updates : भारतीय शेअर बाजारात अडीच महिन्यात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.
Share Market News Updates : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Share Market) यंदाच्या नव्या वर्षाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. बाजारात सतत होत असणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या कमाईला घरघर लागली आहे. मागील अडीच महिन्यात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे (Stock Market Investors) 26.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) 282.44 लाख कोटी रुपये इतके होते. जानेवारीपासूनच्या अडीच महिन्यांत बाजार भांडवल हे 255.90 लाख कोटींवर आले आहे. याचाच अर्थ 2023 मध्ये या अडीच महिन्याच्या कालावधीत बाजार भांडवलात 26.54 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
इतकेच नाही तर मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप आता साडेआठ महिने पूर्वीच्या असलेल्या आकड्याच्या जवळपास पोहोचले आहे. 19 जुलै 2022 रोजी मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 256 लाख कोटी रुपये इतके होते. तर 15 मार्च रोजी मार्केट कॅप 255.90 लाख कोटी रुपये राहिले आहे. याचाच अर्थ 19 जुलैनंतर गुंतवणूकदारांनी कमावलेले सर्व पैसे बुडाले आहेत.
2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आतापर्यंत चांगले राहिलेले नाही. अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने जाहीर केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. अदानी समूहाच्या कंपन्याच्या शेअर दरात जवळपास 85 टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. आता अमेरिकेतून बँकिंग क्षेत्रातून येत असलेल्या नकारात्मक बातम्यांमुळे बाजाराच्या अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) आणि सिग्नेचर बँक (सिंगनेचर बँक) ठप्प झाल्याने बाजारात विक्रीचा सपाटा दिसून येत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
30 डिसेंबर 2022 पासून, नवीन वर्ष 2023 मध्ये परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3300 अंकांनी घसरला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 1133 अंकांची घसरण झाली आहे.
बाजारात घसरण का सुरू?
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक संकटाचा सर्वाधिक परिणाम झाला असल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकन नियामकांच्या हस्तक्षेपानंतरही ही घसरण दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारात घसरण दिसून येत असेल तर त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवरही दिसून येतो. अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसत असून आता मंदीची भीतीदेखील व्यक्त होत आहे.
व्याज दरवाढीची भीती
फेब्रुवारी महिन्यात भारतातील किरकोळ महागाई दरात थोडीशी घसरण झाली आहे. महागाईचा दर 6.44 टक्क्यांवर आला आहे. मात्र, हा दर रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या 6 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिकच आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्ज महाग होण्याची शक्यता आहे. त्याचे सावटही भारतीय शेअर बाजारावर दिसून आले आहे. त्यामुळे 22 मार्च रोजी यूएस फेडरल देखील व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यानंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या प्रक्रियेत काही काळ थांबू शकते, असे अनेक बाजार तज्ज्ञांचे मत आहे.