(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diwali Muhurat trading 2022: मुहूर्त ट्रेंडिग म्हणजे काय? शेअर बाजारातील गुंतवणूकदार समजतात शुभ दिवस
Muhurat trading 2022: दिवाळीत शेअर बाजारातील व्यवहारांना सुट्टी असली तरी सायंकाळी एका तासासाठी शेअर बाजारातील व्यवहार होतात. हे मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे असते तरी काय?
Diwali Muhurt Trading 2022: देशभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. कोरोना महासाथीचे संकट दूर झाल्याने लोकांमध्ये निर्बंध मुक्त दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात दिवाळीनिमित्ताने सुट्टी असते. मात्र, शेअर बाजारात एक तासासाठी व्यवहार सुरू असतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्ताने ट्रेडिंग करण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. या एक तासाच्या ट्रेडिंगला मुहूर्त ट्रेडिंग (Diwali Muhurat trading) असे म्हणतात. या मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. विशेष म्हणजे इतर दिवशी शेअर बाजारातील व्यवहार सकाळी सुरू होतात. तर, हे मुहूर्त ट्रेडिंग (Know About Diwali Muhurat trading) संध्याकाळी होतात.
एक तासासाठी असतो शेअर बाजार
मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान एक तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक इक्विटी, इक्विटी फ्यूचर अॅण्ड ऑप्शन, करन्सी अॅण्ड कमोडिटी मार्केटमध्ये होते. यंदाच्या वर्षात दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. या दिवशी शेअर बाजार संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान खुला असणार आहे. या कालावधीत मुहूर्त ट्रेडिंग केली जाणार आहे. सायंकाळी 6 ते 6.10 वाजेपर्यंत प्री-ओपन सत्र असणार आहे.
पाच दशकांहून अधिक जुनी परंपरा
शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तासाचे ट्रेडिंग करण्याची परंपरा पाच दशकांहून अधिक जुनी परंपरा आहे. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर बाजारात 1957 आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1992 पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात. मात्र, या दिवशी होणारी गुंतवणूक फार कमी आणि प्रतिकात्मक स्वरुपात असते.
मुहूर्त ट्रेडिंग करणे शुभ
मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ट्रे़डिंग करणे हे शुभ असल्याचे समजले जाते. या दिवशी ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते आणि वर्षभर गुतंवणूकदारांकडे संपत्ती कायम येत राहते अशी मान्यता आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी खरेदी करण्यात येणार शेअर्स अतिशय खास समजले जातात. हे शेअर्स दीर्घकाळ मुदतीसाठी ठेवतात. दिवाळीच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे शुभ असते अशी समाजात धारणा आहे. यानुसार, शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून मुहूर्त ट्रेडिंगद्वारे शेअर बाजारात आपली गुंतवणूक करतात.
वर्ष 2021 मध्ये कसे होते मुहूर्त ट्रेडिंग
मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग झाली होती. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर, निफ्टी 17,921 अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे. मात्र, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी दिसून येईल असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.