Share Market : शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात; Nifty 15,400 च्या खाली तर Sensex 1,045 अंकानी घसरला
Stock Market : शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रामध्ये आज घसरण झाली असून मेटलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्याहून अधिकची घसरण झाली.

मुंबई: देशातील वाढती महागाई, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक आणि अमेरिकेतील फेडने वाढवलेले व्याजदर, या सर्वांचा एकत्रित परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं. परिणामी शेअर बाजार गटांगळ्या खात अखेर चांगलाच आपटला. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,045 अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा 331 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये 2.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,479 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 2.19 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,571 अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी हा गेल्या 52 आठवड्यातील नीचांकी पातळीवर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत आज 45 सेंट्सची घसरण झाली असून ती 118.06 डॉलर्सवर स्थिरावली आहे.
अमेरिकेत व्याजदरात वाढ
अमेरिकेत महागाईच्या दराने गेल्या 40 वर्षातील नीचांक पातळी गाठली आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्के वाढ केली आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही व्याज वाढ केली असल्याचे फेडरल रिझर्व्हनं म्हटलं आहे.
परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा
परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे.
FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.
मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरू होती. त्यातच अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याज दर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आज बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भारतीय शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला होता. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे बाजारावरील दबाव हटल्याने खरेदी सुरू झाली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, दुपारच्या सुमारास शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली.
























