Chandrayaan 3: चांद्रयान 3 यशस्वी ठरले तर गुंतवणूकदारांना मालामाल बनवतील हे 5 शेअर्स, स्टॉक्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता
Share Market : चांद्रयान 3 संबंधित विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या तेजी असल्याचं चित्र आहे. चांद्रयानच्या लँडिंगनंतरही त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई: भारताच्या चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) लँडिंगकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं असून बुधवारचा दिवस त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रशियाची चंद्रमोहीम अयशस्वी ठरल्यानंतर भारताच्या चांद्रमोहिमेवर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. पण चांद्रयानच्या यशावर भारतातल्या अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदाराचे यशापयशही अवलंबून आहे. चांद्रयान 3 शी संबंधित विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या तेजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या कंपन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
चांद्रयान-३ च्या या प्रवासात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनीही मोठी भूमिका बजावली आहे. मिशन यशस्वी झाल्यास या कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. या शेअर्समध्येही काही काळ सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर भारताचे अंतराळ यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरले तर ते देशातील खाजगी अवकाश कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग आणि संधी उघडतील. या मिशनशी संबंधित 5 कंपन्या कोणत्या आहेत ते पाहूयात,
Larsen and Toubro Ltd : लार्सन आणि टर्बो
L&T च्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग सुविधेने चांद्रयान 3 साठी स्पेस हार्डवेअर आणि बूस्टर सेगमेंट तयार केले आहेत. या मिशनसाठी प्लेट पुरवण्यासोबतच, कंपनीने लॉन्च व्हेईकलच्या सिस्टम इंटिग्रेशनमध्येही मदत केली आहे. त्यामुळे लार्सन अँड टर्बो लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (Bharat Heavy Electricals Limited) म्हणजेच भेलचे शेअर्सही तेजीने वाढत आहेत. चांद्रयान 3 मोहिमेसाठी भेलने इस्रोला बॅटरीचा पुरवठा केला आहे. कंपनीच्या समभागांनी आज 2 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. मंगळवारी हे शेअर्स 110.30 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 42.05 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.
HAL : हिंदुस्थान एरोनॉटिक्स
हिंदुस्तान एरोनॉटिक्सने (Hindustan Aeronautics Limited) चांद्रयान 3 च्या बांधकामासाठी अनेक आवश्यक घटक पुरवले आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. हा शेअर सध्या 3815 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
Centum Electronics : सेंटम इलेक्ट्रॉनिक्स
आतापर्यंत सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने वेगवेगळ्या अंतराळ मोहिमांसाठी सुमारे 500 घटक पुरवले आहेत. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत सहा टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर्स सध्या 1385 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
Walchandnagar Industries : वालचंदनगर इंडस्ट्रीज
गेल्या एका महिन्यात वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. वालचंदनगर इंडस्ट्रीजनेही इस्रोला अनेक महत्त्वाचे घटक दिले आहेत.
ही बातमी वाचा: