(Source: Poll of Polls)
आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्राबाबूंची संपत्ती किती? सविस्तर माहिती एका क्लिकवर
आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची संपत्ती किती (Net Worth)? हे तुम्हाला माहित आहे का? पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
Chandrababu Naidu Net Worth: तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आज (12 जून) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत. तस जनसेनेचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, तुम्हाला एन चंद्राबाबू नायडू यांची संपत्ती किती (Net Worth)? हे माहित आहे का? पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
चंद्राबाबूंची संपत्ती किती?
चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. निवडणूक आयोगात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची आणि त्यांची पत्नी नारा भुनेश्वरी यांची संपत्ती 931 कोटींहून अधिक आहे. त्यामुळं चंद्राबाबू नायडू यांच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची गणना श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते.
चंद्राबाबू यांच्यावर 10.38 कोटी रुपयांचे कर्ज
आंध्र प्रदेशमध्ये 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने TDP आणि दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याण यांच्या जनसेनासोबत युती करून निवडणूक लढवली होती. या युतीला राज्यात 164 जागा मिळाल्या आहेत. यापैकी टीडीपीला 135, जनसेना पक्षाला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा तपशील दिला होता. MyNeta.info वर या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, नायडू यांच्याकडे 931 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. दुसरीकडे त्यांच्यावर 10.38 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
5 वर्षात चंद्राबाबू यांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ
5 वर्षात चंद्राबाबू यांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 668 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या जंगम मालमत्तेबद्दल बोलायचे तर, दोघांकडे 3 कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने आहेत. रोख रकमेबद्दल बोलायचे झाले तर चंद्राबाबूंकडे केवळ 11,560 रुपये आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे 28,922 रुपये रोख आहेत. या दोघांच्या विविध बँक खात्यांमध्ये 13 लाखांहून अधिक रक्कम जमा आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या संपत्तीत पत्नीचा मोठा वाटा
चंद्राबाबू नायडू यांच्या संपत्तीचा मोठा भाग त्यांच्या पत्नीच्या विविध कंपन्यांमधील स्टेक होल्डिंगचा समावेश आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय बचत योजनेत 1000 रुपये जमा केले आहेत. तर त्यांची पत्नी नारा भुवनेश्वरी हेरिटेज फूड्स कंपनीमध्ये प्रमुख भागधारक आहेत. हेरिटेज फूड्सची स्थापना 1992 मध्ये झाली, ज्यांचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध आहेत. भुवनेश्वरीकडे या कंपनीचे 2,26,11,525 शेअर्स आहेत आणि त्यांचे एकूण मूल्य 763 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्याकडे बँक ऑफ बडोदा, निर्वाणा होल्डिंग्ज प्रायव्हेट, हेरिटेज फिनलीज लिमिटेडचे शेअर्स आहेत.
चंद्राबाबू नायडू यांचे घर 35 कोटी रुपयांचे
चंद्राबाबू नायडू यांच्या नावावर एक ॲम्बेसेडर कार आहे. ज्याची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये आहे. त्यांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेबद्दल सांगायचे तर, चंद्राबाबू नायडू यांच्या नावावर कोणतीही शेतीयोग्य जमीन नाही, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर जवळपास 55 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. नायडू यांच्या नावावर 77 लाख रुपयांची बिगरशेती जमीन नोंदवली आहे. याशिवाय हैदराबाद आणि चित्तूरमध्ये दोन आलिशान घरे आहेत. यापैकी त्याच्या हैदराबादच्या पाली हिलमधील घराची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या: