Made in India : लॅपटॉप आणि पीसी होणार स्वस्त! HP, Dell, Lenovo सह 27 कंपन्यांना केंद्राची मंजुरी
PC, Laptops Made In India : आता लॅपटॉप आणि पीसी भारतात तयार होणार आहेत. एचपी (HP), डेल (Dell), लेनोवो (Lenovo) सह 27 कंपन्यांना सरकारने भारतात उत्पादनासाठी (Make In India) मान्यता दिली आहे.
Made in India Laptop & PC : भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लॅपटॉप (Laptop) आणि कॉम्प्युटर (Computer) 'मेड इन इंडिया' (Made In India) असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतात लॅपटॉप आणि पीसी स्वस्त दरात खरेदी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे 'मेड इन इंडिया'वर (Made In India) भर देण्यात येत आहे. याचं पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एचपी (HP), डेल (Dell), लेनोवो (Lenovo) सह 27 कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी मान्यता दिली आहे.
आता लॅपटॉप आणि पीसी 'मेड इन इंडिया'!
भारत सरकारने चालवल्या जाणार्या प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत HP, Lenovo आणि Dell यासह 27 कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर या कंपन्यांना आयटी हार्डवेअरसाठी सरकारने आणलेल्या 17 हजार कोटी रुपयांच्या पीएलआय (PLI) योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला IT हार्डवेअरमध्ये PLI साठी एकूण 40 प्रस्ताव प्राप्त झाले होते. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
3000 कोटी रुपयांची गुंतवणूक
आयटी हार्डवेअरमध्ये पीएलआयचा लाभ घेणाऱ्या कंपन्या भारतात लॅपटॉप, पीसी आणि सर्व्हर यांसारखी उपकरणे तयार करतील. यासाठी सर्व कंपन्यांकडून एकूण 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, 27 पैकी 23 कंपन्या भारतात तात्काळ उत्पादन सुरू करतील आणि उर्वरित चार कंपन्या 90 दिवसांत उत्पादन सुरू करतील. पुढील सहा वर्षांत या PLI योजनेंतर्गत 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होण्याची शक्यता आहे.
दोन लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार
विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर सुमारे 50,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि 1,50,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पीएलआय योजनेचा दुसरा टप्पा मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता. त्यासाठी 17,000 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. हे बजेट पहिल्या टप्प्यापेक्षा दुप्पट होते. यामध्ये कंपन्यांना जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता.
सरकारच्या प्रयत्नांना यश
पीएलआयचा पहिला टप्पा आयटी हार्डवेअरमध्ये फारसा यशस्वी नव्हता. सरकारला 2500 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळण्याची अपेक्षा होती, पण फक्त 120 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले. काही काळानंतर सरकारने दुसरा टप्पा सुरू केला, ज्यामध्ये सुमारे 58 कंपन्यांकडून गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. याबाबत सरकारने सांगितलं होतं की, पीएलआयच्या दुसऱ्या टप्प्यात आयटी हार्डवेअरमध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीचे प्रस्ताव आले आहेत.
लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयात बंदीचा निर्णय मागे
केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट आदी गॅझेटच्या आयात बंदीचा (Laptop Tablet Import Ban) निर्णय मागे घेतला. ऑगस्ट 2023 मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलं आहे.