Budget 2022: जाणून घ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या इतिहासातील काही रंजक तथ्य
Budget Facts : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जाणून घ्या काही रंजक तथ्य...
Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग चौथ्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाशी निगडीत काही रंजक तथ्यही आहेत. जाणून घेऊयात या काही रंजक तथ्यांबाबत
- भारताचा पहिला अर्थसंकल्प: भारतात 7 एप्रिल 1860 रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी अर्थसंकल्प सादर केला.
- स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. तत्कालीन अर्थ मंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी अर्थ संकल्प सादर केला.
- सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण : निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना दोन तास 42 मिनिटांचे भाषण दिले. या दरम्यान त्यांनी 2 जुलै 2019 रोजी अर्थसंकल्प सादर करताना स्वत: केलेल्या दोन तास 17 मिनिटे भाषणाचा विक्रम मोडला.
- डॉ. मनमोहन सिंह यांनी 1991 रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द होते. या भाषणात 18 हजार 650 शब्द होते. त्यानंतर अरुण जेटली यांनी 2018 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण करताना 18 हजार 604 शब्दांचा वापर केला होता.
- वर्ष 1977 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री हिरूभाई मुलजीबाई पटेल यांनी 1977 मध्ये केलेले अर्थसंकल्पीय भाषण सर्वात लहान भाषण आहे. जवळपास 800 शब्दांचे हे भाषण होते.
- माजी पंतप्रधान मोररजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोररजी देसाई यांनी 1962-69 दरम्यान अर्थ मंत्री असताना सर्वाधिक 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर पी. चिदंबरम (9 वेळा), प्रणब मुखर्जी (8 वेळा), यशवंत सिन्हा (8 वेळा) आणि डॉ. मनमोहन सिंह (6 वेळा) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
- वर्ष 1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सादर केले जात असे. मात्र, यशवंत सिन्हा यांनी 1999 रोजी ही वेळ बदलली. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास त्यांनी सुरुवात केली.
- वर्ष 2017 मध्ये अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्प एक फेब्रुवारीपासून सादर केला जाऊ लागला.
- वर्ष 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प वेगवेगळे सादर केले जात असे. मात्र, 2017 मध्ये रेल्वे अर्थ संकल्प हे केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला.