2024 च्या अर्थसंकल्पात कशावर असणार भर? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होतात, याकडं सर्वांचं लक्ष आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारामन काही वेगळी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
Budget 2024 Expectations: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या (Modi Govt) चालू कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारामन काही वेगळी घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अर्थसंकल्पात नेमका भर कशावर?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. आपल्या भाषणात, त्यांनी सांगितले की 2014 नंतर, मोदी सरकारने ‘अर्जन्सी’ आणि ‘मिशन मोड’ मध्ये योजना राबवल्या आहेत. विकसित भारताचा पाया कसा घातला. अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष कोठे असणार याबाबत संकेत दिले होते. सरकार जात किंवा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही. त्यामुळं प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा, अशा पद्धतीने सरकारी योजना बनवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची फक्त चार गटांमध्ये विभागणी केली आहे. ते म्हणजे तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी हे 4 गट ठेवण्याचे संकेत निर्मला यांनी दिले होते.
कौशल्य विकास, उत्तम कृषी तंत्रज्ञानासह आरोग्य क्षेत्रावर भर
युवक, महिला, शेतकरी जे आपल्याला अन्न सुरक्षा देतात आणि गरीब ज्यांना अजूनही सरकारी मदतीची गरज आहे यांच्यासाठी अर्थसंकल्पात काही घोषणा होतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमची सर्व धोरणे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी तयार केली जात असल्याचे सीतारामन म्हणाल्या होत्या. जेव्हा त्यांना मध्यभागी ठेवले जाते, तेव्हा आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तो कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हे पाहणं गरजेचं नाही. आर्थिक दृष्टिकोनातून सरकार कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे याचेही संकेत सीतारामन यांनी दिले होते. यामध्ये कौशल्य विकास, उत्तम कृषी तंत्रज्ञान आणि देशातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.
सीतारामन करणार मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प नसेल कारण 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळं निवडणूकपूर्व खर्च भागवण्यासाठी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यासह, सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार विक्रम, 'या' माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्ड मोडणार