(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑगस्टमध्ये BSNL ची 4 जी सेवा देशभरात चालू होणार, कंपनीकडून युद्धपातळीवर तयारी!
बीएसएनएल ही संस्था लवकरच संपूर्ण देशात 4 जी सेवा चालू करणार आहे. त्यासाठी या संस्थेकडून तयारी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या ऑगस्ट महिन्यात ही सेवा देशभरात चालू होईल, अशी शक्यता आहे.
मुंबई : केंद्र सरकारची दूरसंचार कंपीनी बीएसएनएल (BSNL) या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून देशभरात 4 जी सेवा लागू करणार आहे. ही सेवा चालू करण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा ही भारतीय बनावटीची असणार आहे. बीएसएनलच्या सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. येत्या ऑगस्टपासून बीएसएनएल 40-45 मेगाबाईट प्रति सेकंद (एमबीपीएस) या वेगाने ही सेवा देणार असल्याचे म्हटले जात आहे.
लवकरच देशभरात 4 जी सेवा
बीएसएनएलने माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि दूरसंचार संशोधन संस्था C-DOT यांच्या सहकार्याने 4 जी सेवेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर बीएसएनएलकडून केला जाणार आहे. बीएसएनएलने याआधी पंजाबमध्ये 4 जी सेवा चालू केलेली आहे. या सेवेच्या माध्यमातून बीएसएनएलने तेथे साधारण आठ लाख ग्राहक जोडलेले आहेत.
बीएसएनएलकडून देशभरात टॉवर लावण्याचे काम
बीएसएनएल कंपनीकडून सध्या संपूर्ण देशात 4 जी, 5 जी सेवा देण्यासाठी 1.12 लाख टॉवर लावण्याचे काम केले जात आहे. या कंपनीने 4 जी सेवा देण्यासाठी आतापर्यंत 9,000 पेक्षा अधिक टॉवर्सची स्थापना केलेली आहे. यातील 6,000 पेक्षा अधिक टॉवर हे पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांत आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बीएसएनएल ही कंपनी 4 जी सेवा देऊ शकणारेच सीमकार्ड विकत आहे.
प्रतिस्पर्ध्यांशी करावा लागणार सामना
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया यासारख्या दिग्गज कंपन्या एकमेकांसमोर उभ्या असतात. या खासगी कंपन्या आधीपासूनच 4जी आणि 5 जी सेवा देत आहेत. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड देण्यासाठी बीएसएनएलला मोठ मेहनत घ्यावी लागणार आहे.
4 जी सेवेला एवढा उशीर का?
दरम्यान, सध्या देशातील जवळपास सर्वच भागांत 5 जी सेवा चालू झाली आहे. असे असतना बीएसएनएलने हे तंत्रज्ञान आत्मसात का केले नाही. 4 जी सेवा सुरु करायलाच बीएसएनएलला एवढा उशीर का झाला? असे प्रश्न विचारले जात आहेत. याला काही कारणं आहेत. बीएसएनएल कंपनीकडे 2जी आणि 3जी नेटवर्कसाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाला 4 जी तंत्रज्ञानात अपग्रेड करणे ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. बीएसएनएलकडे पुरेसे 4 जी स्पेक्ट्रम नाही. त्यामुळे बीएसएनएलला त्यांची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येतात. बीएसएनएलकडे हे 4 जी तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान नाही. त्यामुळेही बीएसएनएलला हे तंत्रज्ञान स्वीकारायला वेळ लागला आहे.
हेही वाचा :
'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!
निवडणूक संपताच सामान्यांच्या खिशाला बसणार झळ? मोबाईलचा डेटा पॅक महागणार?
जगातील कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं, भारताच्या सरकारी खजान्यात किती टन सोनं?