Boeing Layoffs : 33000 कर्मचारी संपावर, कंपनीचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका, अनेकांना देणार नारळ
जगातील आघाडीची विमान उत्पादक कंपनी बोईंगने (Boeing) देखील नोकरकपात करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कंपनीने नोकरभरती थांबवली आहे.
Boeing Layoffs News: जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात (Layoffs) केली आहे. वाढता खर्च आणि सध्या सुरु असेललं मंदीचं वातावरण यामुळं नोकरकपात सुरु आहे. जगातील आघाडीची विमान उत्पादक कंपनी बोईंगने (Boeing) देखील नोकरकपात करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या कंपनीने नोकरभरती थांबवली आहे. तसेच वाढता खर्च कमी करण्यासाठी तात्पुरती नोकरकपात देखील करणार असल्याचं बोईंगने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले सांगितले आहे. आमचा व्यवसाय कठीण काळात आहे. गेल्या आठवड्यात बोईंगच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाला. या संपात सुमारे 33 हजार कर्मचारी सहभागी आहेत.
बोईंग पैसे वाचवण्यासाठी काय करणार?
कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) ब्रायन वेस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पैसे वाचवण्यासाठी 10 पावले उचलणार आहे. छाटणी व्यतिरिक्त, यामध्ये सर्वत्र नियुक्ती थांबवणे, व्यवस्थापकांच्या पगारातील वाढ समाप्त करणे आणि अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करणे समाविष्ट आहे. नोकरकपातीचा परिणाम कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही होईल. त्याची संपूर्ण माहिती येत्या काही आठवड्यांत दिली जाईल.
सुमारे 33000 कर्मचारी संपावर
सुमारे 33,000 बोईंग कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून संप सुरू केला आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 4 वर्षात पगारात 25 टक्के वाढ करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, वर्षाला पगारात 10 टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. सरकारने कंपनी आणि युनियनमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही याबाबत बैठक होणार आहे. युनियन कर्मचाऱ्यांना त्यांच्या नवीन करारात काय हवे आहे हे शोधण्यासाठी सर्वेक्षण करत आहे. वॉशिंग्टन, ओरेगॉन आणि कॅलिफोर्नियासह अनेक ठिकाणी बोईंगचे कर्मचारी संपावर आहेत.
कंपनीला मिळतोय नफा मात्र, कर्मचाऱ्यांना...
बोईंगच्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा संप 2008 मध्ये झाला होता. कंपनी सतत नफा कमवत आहे पण आम्हाला त्यातला काही भाग देत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. वार्षिक बोनस निश्चित करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. पण, बोईंगचे म्हणणे आहे की 33,000 लोकांचा बोनस ठरवणे सोपे काम नाही. कर्मचारीही उत्तम पेन्शन आणि आरोग्य सेवा योजनेची मागणी करत आहेत.
टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनीही केली नोकरकपात
टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात केली असून तब्बल 52000 नोकरदार घरी बसले आहेत. कंपन्यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालातून ही आकडेवारी समोर आली असून टाटा, रिलायन्स, रेमंड, स्पेन्सर अशा नावाजलेल्या कंपन्यांनी हजारो कामगारांची नोकर कपात केली आहे.
महत्वाच्या बातम्या: