‘BharatPe’च्या अश्नीर ग्रोव्हर यांच्यासह पत्नीची देखील ‘सुट्टी’, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
Ashneer Grover : ग्रोव्हर दांपत्याचा कोटक महिंद्रा बँकेसोबतचा वाद समोर आल्यानंतर भारतपे चौकशीला समोर जात आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित अनेक बाबी समोर येऊ शकतात.
BharatPe : अलीकडेच, भारतपेचे (BharatPe) संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) वादात अडकल्यानंतर दीर्घ रजेवर जात असल्याची बातमी आली होती. आता त्यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हरही (Madhuri Grover) रजेवर गेल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतपेमध्ये कंट्रोल हेड म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी यांनीही रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरापूर्वी त्यांचे पती अश्नीरही मार्च 2022पर्यंत रजेवर गेले आहेत.
ग्रोव्हर दांपत्याचा कोटक महिंद्रा बँकेसोबतचा वाद समोर आल्यानंतर भारतपे चौकशीला समोर जात आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित अनेक बाबी समोर येऊ शकतात.
‘भारतपे’ने त्यांच्या एका निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळ कंपनीमध्ये कामकाजाचा उच्च दर्जा राखण्याच्या बाजूने आहे. हे लक्षात घेऊन, अंतर्गत प्रक्रिया आणि प्रणालींच्या स्वतंत्र पुनरावलोकनाची जबाबदारी व्यवस्थापन सल्लागार फर्म Alvarez & Marsal फर्मवर सोपवण्यात आली आहे. मात्र, यावेळी ‘भारतपे’कडून माधुरी यांच्या अचानक रजेवर जाण्यावर भाष्य करण्यात आलेले नाही.
नेमकं प्रकरण काय?
19 जानेवारी रोजी, भारतपेचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी मार्चपर्यंत रजेवर जाण्याची घोषणा केली होती. खरं तर, जानेवारीच्या सुरुवातीला एका ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये अश्नीर कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला फोनवर धमकावत होते. Nykaa च्या IPO दरम्यान शेअर्स वाटप करताना बँकेकडून अनियमितता झाल्याचा आरोप करत, ते संबंधिताला धमकावत होते.
मात्र, अश्नीर यांनी ही क्लिप बनावट असल्याचे म्हणत, हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, नंतर असे लक्षात आले की, अश्नीर आणि त्यांची पत्नी माधुरी यांनी ऑक्टोबर 2021मध्ये कोटक महिंद्रा बँकेला Nyka च्या IPO ला वित्तपुरवठा करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल नोटीस पाठवली होती.
पती-पत्नी ऐच्छिक रजेवर!
ग्रोव्हर पती-पत्नी रजेवर गेल्याने त्यांना कंपनीने काढून टाकलेय, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यावर भारतपे कंपनीच्या बोर्डाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलेय. त्यात त्यांनी म्हटलेय की, सध्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकलेलं नाही. यासंदर्भात आलेले सर्व रिपोर्ट्स निराधार आणि असत्य आहेत. कंपनी स्वतंत्र आणि कसून चौकशी करण्यास वचनबद्ध आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही कारवाई केली नाही, आणि केली जाणारही नाही. प्रसारमाध्यांना विनंती आहे की, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अथवा अहवाल येण्यापूर्वी अंदाज लावू नये. माहिती नसलेल्या स्त्रोतांच्या आधारे कोणत्याही बातम्या देऊ नये.
हेही वाचा :
- BharatPe चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर ऐच्छिक रजेवर, कुणालाही कामावरुन काढलं नसल्याचं कंपनीचं स्पष्टीकरण
- शहरी बेरोजगारीला मोदी सरकार लावणार लगाम?; अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha