(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा झटका, 355 दशलक्ष डॉलरचा दंड, नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (former US President Donald Trump) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयानं त्यांना मोठा झटका दिलाय.
Donald Trump : अमेरिकेच्या निवडणुकीच्या मैदानात पुन्हाा एकदा उतरणारे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (former US President Donald Trump) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयानं त्यांना मोठा झटका दिलाय. फसवणूक प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना 355 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. तसेच, ते आता कोणत्याही कंपनीत तीन वर्षे संचालक होऊ शकत नाहीत किंवा कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊ शकत नाहीत.
नेमकं प्रकरण काय?
फसवणुकीशी संबंधित एका प्रकरणात, न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपन्यांना 355 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 29,46,09,17,500 रुपये) दंड ठोठावला आहे. याशिवाय त्याच्यावर तीन वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे. ट्रम्प यांचा मोठा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. जो जगभरात पसरलेला आहे. ट्रम्प यांनी त्यांची एकूण संपत्ती आहे त्यापेक्षा जास्त सांगून बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या मालमत्तेचे भाव फुगवले होते. मॅनहॅटनमध्ये तीन महिन्यांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात सांगितले की, ट्रम्प पुढील तीन वर्षे कोणत्याही कंपनीत संचालकपदावर राहू शकत नाहीत. तसेच या कालावधीत ते कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊ शकत नाही. या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प हे एक यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक
ट्रम्प, जे पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. न्यूयॉर्कच्या न्यायाधीशांनी बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रम्प यांना दंड ठोठावला आहे. दरम्यान, ट्रम्प हे एक यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक देखील आहेत. मॅनहॅटनमधील ट्रम्प टॉवर हे त्यांचे वैयक्तिक निवासस्थान आहे. याच धर्तीवर त्यांनी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ट्रम्प टॉवर उभारले आहेत. भारतातील ट्रम्प टॉवर कल्याणी नगर, पुण्यात बांधला गेला आहे, ज्याचे उद्घाटन ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर यांनी 2018 मध्ये केले होते. हा ट्रम्प टॉवर भारतीय रिअल इस्टेट कंपनी पंचशील डेव्हलपर्सच्या सहकार्याने बांधण्यात आला आहे.
ट्रम्प यांचा भारतातील व्यवसाय
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ट्रम्प यांनी इतर व्यवसायांमध्येही पैसा गुंतवला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उत्तर अमेरिकेनंतर जिथे ट्रम्प यांनी रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे, तो भारत आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशन हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या 500 व्यावसायिक घटकांचा समूह आहे. यापैकी 250 हून अधिक कंपन्या ट्रम्प यांच्या नावाचा वापर करतात. याची स्थापना ट्रम्प यांची आजी एलिझाबेथ क्राइस्ट ट्रम्प आणि वडील फ्रेड ट्रम्प यांनी ई. ट्रम्प अँड सन्स म्हणून केली होती. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 5,000 कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या:
बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ