बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
US Election 2024: येणारं नवं वर्ष निवडणुकांचं असणार आहे. 2024 मध्ये अमेरिकेसह (US Elections 2024) जगभरातील अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. अमेरिकेत (America) पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका रंजक होणार आहेत. अशातच, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटलं आहे की, सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो.
ट्रम्प म्हणाले की, कमला हॅरिस या त्यांचे बॉस जो बायडन यांच्यापेक्षा चांगल्या राष्ट्राध्यक्ष ठरतील. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात बायडन यांच्यापेक्षा वाईट राष्ट्राध्यक्ष झालेला नाही. वयामुळे तो अनेकवेळा समीक्षकांच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे हॅरिस यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे.
ट्रम्प यांनी एका रेडिओ कार्यक्रमात सांगितलं की, असं दिसतं की, बायडन यांनी कमला हॅरिस यांना अनेक कारणांमुळे उपराष्ट्रपती बनवले आहे. जो बायडन यांना कमला हॅरिस यांची निवड करण्यास भाग पाडलं गेलं. डेमोक्रॅट्सनं हॅरिसला पर्याय म्हणून ठेवलं आहे. पण मला वाटतं की, एक प्रकारे हॅरिस हे बायडनपेक्षा चांगले अध्यक्ष सिद्ध होतील.
जो बायडन आगामी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाहीत?
अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष पदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आगामी निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षांना उमेदवारीत ट्रम्प सध्या आघाडीवर आहेत. त्याच्यानंतर रॉन डीसेंटिस आणि निक्की हेली आहेत.
एका मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावरही अनेक आरोप केले. ते म्हणाले की, लोकशाहीवादी भ्रष्ट आहेत. ते म्हणाले की, मी 20 डिबेटमध्ये सहभाग घेणार असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांना पाहिजे तितक्या डिबेटमध्ये सहभाग घेऊ शकतो. मी रोज रात्री म्हटलं तरी बायडंन यांच्याशी वाद घालू शकतो, पण मला माहिती आहे, यासाठी बायडन तयार होणार नाहीत. दरम्यान, कमला हॅरिसबाबत ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्यही आश्चर्यकारक आहे. 2020 च्या निवडणुकीत जेव्हा कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत होत्या, तेव्हा ट्रम्प यांनी त्यांना अकार्यक्षम म्हटलं होतं. त्यांची मुलगी इव्हांका ही एक उत्तम राष्ट्राध्यक्ष ठरेल, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
कोण आहे कमला हॅरिस?
कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत. कमला हॅरिस यांच्या आई भारतीय होत्या, तर त्यांचे वडील जमैकाचे होते. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे झाला. कमला हॅरिस या केवळ अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनलेल्या पहिल्या महिला नाहीत, तर या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आशियाई अमेरिकन आणि आफ्रिकन अमेरिकन महिला देखील आहेत.