Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का, रिलायन्स पॉवरच्या CFO ला अटक, ईडीची कारवाई
Anil Ambani: अंमलबजावणी संचलनालयाकडून म्हणेच ईडीकडून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या मुख्य वित्तीय अधिकारी अशोक कुमार पाल यांना अटक करण्यात आली आहे.

Reliance Power News नवी दिल्ली : उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) अशोक कुमार पाल यांना ईडीनं अटक केली आहे. यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 13 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. नेमक्या त्याच दिवशी रात्री उशिरा रिलायन्स पॉवरचे CFO अशोक कुमार पाल यांना ईडीनं अटक केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ईडीनं अशोक पाल यांना दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयातून चौकशीनंतर अटक केली. शनिवार म्हणजे आज ईडीचं पथक अशोक पाल यांना दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टात हजर करेल. या ठिकाणी ईडीकडून चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाईल. बनावट बँक तारणासंदर्भात अशोक पाल यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
ED Arrested Reliance Power CFO: ईडीच्या कारवाईचं कारण?
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार अशोक पाल यांच्यावर 68.2 कोटी रुपयांच्या संश्यास्पद बँक तारण घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपानुसार अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून रिलायन्स समुहातील आर्थिक अनियमिततांबाबत चौकशी केली जात आहे. अशोक पाल यांची अटक 2024 मधील एका एफआयआरच्या आधारे करण्यात आली आहे. ज्यामध्ये सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला बनावट तारण देण्यात आलं होतं.
बनावट बँक गॅरंटी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड आणि महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेडच्या नावानं जारी करण्यात आली होती. या संबंधात ईडीनं अशोक पाल यांना अटक केली आहे. ते रिलायन्स पॉवरमध्ये कार्यकारी संचालक म्हणून देखील कार्यरत आहेत. कंपनीत ते गेल्या 7 वर्षांपासून जोडले गेले आहेत. असं म्हटलं जातं की अनिल अंबानी यांच्या निकटवर्तीय लोकांपैकी ते आहेत.
चौकशीत पुरावे मिळाले
ईडीच्या चौकशीमध्ये या संपूर्ण आर्थिक अनियमिततेत ओडिशाची बिस्वाल ट्रेडलिंकचा हात आहे. ईडीच्या दाव्यानुसार बिस्वाल ट्रेडलिंकनं बनावट बँक गॅरंटी बनवली होती. यासाठी कंपनीचे संचालक पार्थ सार्थी बिस्वाल यांनी 8 टक्के कमिशन घेतलं होतं. ईडीनं ऑगस्ट 2025 मध्ये पार्थ सार्थीला अटक केली आहे.
अशोक कुमार पाल यांच्याकडून बनावट वाहतूक बिलं तयार करुन पैसे वर्ग केले गेले आहेत, याची माहिती ईडील मिळाली आहे. हे व्यवहार मंजूर करण्यासाठी व्हाटसएप आणि टेलिग्राम सारख्या ॲपचा वापर करण्यात आला. कारण कंपनीच्या अधिकृत यंत्रणेवर याची माहिती नोंदवली जाऊ नये.
रिलायन्स पॉवरचा शेअर किती रुपयांवर?
रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 9 ऑक्टोबर 2020 ला 2.75 रुपयांवर होती. शुक्रवारी म्हणजे 10 ऑक्टोबरला या कंपनीच्या शेअरी किंमत 50.70 रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 5 वर्षात 1670 टक्के तेजी आली आहे.



















