(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आनंद महिंद्रांची 13 वर्षीय मुलीला थेट नोकरीची ऑफर! तिच्या 'या' एका कामामुळे झाले प्रभावित!
आनंद महिंद्रा यांनी 13 वर्षीय मुलीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. समाजमाध्यम खात्यामार्फत त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
मुबंई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच चर्चेत असतात. ते समाजमाध्यमावर वेगवेगळ्या विषयावर आपले मत खुलेपणाने व्यक्त करतात. भारतातील अनेक लोक त्यांच्याकडे थेट वेगवेगळ्या मागण्या करताना दिसतात. विशेष म्हणजे तेही यातील काही लोकांच्या मागण्या खुल्या मनाने मान्य करतात. सध्या मात्र आनंद महिंद्र यांनी एका 13 वर्षीय मुलीला स्वत:हून थेट नोकरीची ऑफर दिली आहे.
आनंद महिंद्रांनी दिली नोकरीची ऑफर
यापूर्वी आनंद महिंद्रा यांच्याकडे वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत. त्यांच्याकडे याआधी कोणी कार मागितलेली आहे तर कोणी त्यांच्याकडे नोकरी देण्याची विनंती केलेली आहे. यावेळी मात्र खुद्द महिंद्र यांनी निकिताला नोकरीची ऑफर दिली आहे. ही मुलगी मुळची उत्तर प्रदेशातील बस्ती या शहातील रहिवासी आहे. तिने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत स्वत:चे तसेच तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचवले होते. अलेक्झा या व्हॉइस असिस्टंटची मदत घेऊन हल्ला करणाऱ्या माकडांना हुसकावून लावले होते. त्या मुलीच्या याच कामगिरीची दखल घेत आनंद महिंद्रा यांनी तिला नोकरीची ऑफर दिली आहे.
The dominant question of our era is whether we will become slaves or masters of technology.
— anand mahindra (@anandmahindra) April 6, 2024
The story of this young girl provides comfort that technology will always be an ENABLER of human ingenuity.
Her quick thinking was extraordinary.
What she demonstrated was the… https://t.co/HyTyuZzZBK
आनंद महिंद्र यांनी काय ऑफर दिली?
आनंद महिंद्र यांनी मुलीला नोकरीची ऑफर देताना एक्स या समाजमाध्यमावर एक ट्वीट केलं आहे. आपल्या या ट्वीटमध्ये महिंद्र यांनी माकडांना हुसकावून लावणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे तोंडभरून कौतूक केले आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होणार की या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणार हा आजच्या जगातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी कल्पकता अधिक सक्षम होऊ शकते, हेच या मुलीच्या उदाहरणातून स्पष्ट होते. तिने केलेला हा विचार कौतुकास्पद आहे. यातून तिची नेतृत्वशैलीच समोर आली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर या मुलीला जर कॉर्पोरेट जगात नोकरी करायची इच्छा असेल तर आम्ही मदत करू. मी अपेक्षा करतो ही मुलगी शिक्षण झाल्यावर आमच्यासोबत काम करण्यास उत्सूक असेल, असे मत आनंद महिंद्र यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या मुलीने अलेक्झाला दिलेल्या आदेशाचा आणि त्यानंतर माकडांनी पळ काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकांनी या मुलीच्या शौर्याची दखल घेत तिचे कौतुक केले होते.