अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! प्रत्येक नागरिकावर 84 लाख रुपयांचं कर्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठं आव्हान
सध्या अमेरिकेवरील कर्ज 36 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. अवघ्या चार महिन्यांत अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकावर 1 लाख डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे.
America Debt Crisis: अमेरिकेत (America) झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जानेवारी 2025 मध्ये ते दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते अमेरिकेवर असणाऱ्या कर्जाचे. सध्या अमेरिकेवरील कर्ज 36 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे. अवघ्या चार महिन्यांत अमेरिकेचे कर्ज एक ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिकावर 1 लाख डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 84 लाखांच्या कर्जाची थकबाकी आहे. जेव्हा राष्ट्राध्यक्ष बिडेन सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर 26.9 ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. त्यांच्या कार्यकाळात कर्जाचा बोजा 9 ट्रिलियन डॉलरने वाढला आहे.
एका अमेरिकन नागरिकावर 1 लाख डॉलरचे कर्ज
गेल्या आठवड्यात, ट्रेझरी विभागाने अमेरिकेच्या थकित कर्जाची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार अमेरिकेवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज 36 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. तर जून 2024 मध्ये अमेरिकेवर 35 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. म्हणजे अवघ्या चार महिन्यांत कर्जाचा बोजा एक ट्रिलियन डॉलरने वाढला आहे. अमेरिकेचे कर्ज दरवर्षी 3 ट्रिलियनने वाढत आहे. अमेरिकेवर असलेल्या कर्जाच्या या आकडेवारीनुसार प्रत्येक अमेरिकन नागरिकावर एक लाख डॉलर (84 लाख रुपये) कर्जाचा बोजा आहे.
वर्षाला एक ट्रिलियन डॉलर्सचे व्याज
अमेरिकेवर मोठा कर्जाचा डोंगर झाला आहे. अमेरिका कर्जाच्या जाळ्यात अडकल्यामुळे दरवर्षी तिथल्या सरकारला एक ट्रिलियन डॉलर्सचे व्याज द्यावे लागते. जे संरक्षण, पायाभूत सुविधा, शिक्षण, गरिबी निर्मूलन कार्यक्रम, सामाजिक सुरक्षा आणि मेडिकेअरवर अमेरिकन सरकारच्या खर्चापेक्षा जास्त आहे.
अमेरिकेवर का वाढतोय कर्जाचा बोजा?
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला असे नाही. जेव्हा बिडेन सरकार सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर 26.9 ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते. त्यांच्या कार्यकाळात कर्जाचा बोजा 9 ट्रिलियन डॉलरने वाढला आहे. ट्रम्प जेव्हा शेवटचे सत्तेवर आले तेव्हा अमेरिकेवर 19 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते. त्यांनी मागील कार्यकाळात कर्ज कमी करण्याचे आश्वासन दिले होते पण ते वाढले. यापूर्वीच्या अनेक सरकारांनी केलेल्या फालतू खर्चामुळे अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे.
अमेरिकन नागरिकांवर कराचा बोजा वाढणार
अमेरिकेची वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमेरिकेवर सध्याचा कर्जाचा बोजा दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या वर्षी दिसला होता. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे अमेरिकन सरकारला आपल्या अर्थसंकल्पात व्याजाच्या पेमेंटसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. त्याचबरोबर सरकारला आपल्या नागरिकांवर अधिक कर लादावे लागतील. त्याचवेळी, डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर देशातील नागरिकांना हद्दपार करण्याची जी घोषणा केली होती, ती अंमलात आणल्यास अमेरिकेचे कर्ज संकट अधिक गडद होऊ शकते. कारण हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील. कर्जाच्या संकटावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन सरकारला बजेटमध्ये 8 ट्रिलियन डॉलर्सच्या खर्चात कपात करावी लागेल, तरच अमेरिका कर्जाच्या संकटातून बाहेर पडू शकेल.