Adani Group : अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स SBI कडे गहाण, हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम? वाचा सविस्तर
Adani Group Pledge Shares : अदानी समूहाने तीन कंपन्यांचे अतिरिक्त शेअर्स स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) गहाण ठेवले आहेत.
Adani Group Pledge Shares : अदानी समुहाने (Adani Group) तीन कंपन्यांचे शेअर्स गहाण ठेवले आहेत. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालकीच्या अदानी समुहासंबंधित बातम्यांचा परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर दररोज दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. आता अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी यांनी त्यांचे शेअर्स SBI कडे गहाण ठेवले आहेत. अदानी समुहाने एसबीआयसीएपी ट्रस्टी कंपनीकडे (SBICAP Trustee) गहाण ठेवले आहेत.
अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स तारण
अदानी समूहाने तीन कंपन्यांचे अतिरिक्त शेअर्स स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) गहाण ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी, अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानीवर फसवणुकीचा आरोप केला. यानंतर, अदानी समुहाला मोठं नुकसान झालं आहे. अदानी समुहाला बाजारात सुमारे 120 बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे. यानंतर भारतीय शेअर बाजारातही मोठी उलाढाल पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांमध्ये अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सबाबत शंका निर्माण झाली आहे.
एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे शेअर्श गहाण
अदानी समुहाने तीन कंपन्यांचे शेअर्श एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे (SBICAP Trustee) तारण ठेवले आहेत. SBICAP ही भारतीय स्टेट बँकेची (SBI) देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी कंपनी आहे. अदानी समुहाने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांचे शेअर्स SBI कॅप ट्रस्टी कंपनीकडे गहाण ठेवले आहेत.
SBICAP कडे एक टक्के शेअर्स गहाण
अदानी समुहाने आतापर्यंत SBICAP कडे एक टक्के शेअर्स गहाण ठेवले आहेत. या अंतर्गत, APSEZ चे 75 लाखांहून अधिक शेअर्स तारण ठेवले आहेत. अदानी ग्रीन कंपनीचे एकूण 1.06 टक्के शेअर्स 60 लाख अतिरिक्त शेअर्ससह गहाण ठेवण्यात आले आहेत. स्टॉक एक्सेंज फायलिंगमध्ये हे समोर आलं आहे. फाइलिंगनुसार, अदानी ट्रान्समिशनच्या 13 लाख अतिरिक्त शेअर्ससह एकूण 0.55 टक्के शेअर्स गहाण ठेवण्यात आले आहेत.