(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अदानी समूहानं एक मोठा निर्णय, संरक्षण क्षेत्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक
Adani Group : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालकीच्या असलेल्या अदानी समूहानं (Adani Group) एक मोठा निर्णय घेतलाय. संरक्षण क्षेत्रासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
Adani Group : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालकीच्या असलेल्या अदानी समूहानं (Adani Group) एक मोठा निर्णय घेतलाय. संरक्षण क्षेत्रासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. अदानी समूह 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन दोन शस्त्रास्त्र कारखाने उभारणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये हे कारखाने बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी दारुगोळा तयार केला जाणार आहे. यामुळं सुमारे 4000 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
500 एकर जागेवर बांधण्यात येणार कारखाने
अदानी समूह उभारणाऱ्या या कारखान्यांमध्ये वर्षाला सुमारे 15 कोटी दारुगोळा तयार केला जाऊ शकतो, जो भारतीय लष्कराच्या एकूण गरजेच्या सुमारे एक चतुर्थांश आहे. यामुळे देशात स्थानिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्मितीला चालना मिळणार आहे. दरम्यान, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील निर्माण होमार आहेत. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस हे कारखाने कानपूरजवळ सुमारे 500 एकरवर बांधणार आहेत. भारतीय लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यात हे कारखाने महत्त्वाची भूमिका बजावतील, असे गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले. यामध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबरचा दारुगोळा बनवण्यात येणार आहे. हे सैन्य, निमलष्करी आणि पोलिसांना पुरवले जाणार असल्याचं करण अदानी यांनी सांगितलं.
क्षेपणास्त्रे बनवण्यात येणार
या कारखान्यांच्या मदतीने सुमारे 4000 नवीन नोकऱ्या निर्माण होणार असल्याची माहिती अदानी यांनी दिली. सन 2025 पर्यंत मोठ्या कॅलिबर तोफखाना आणि टँक शेल्सच्या 2 लाख फेऱ्या येथे तयार केल्या जाऊ शकतात. तसेच, मध्यम कॅलिबर शेलच्या 50 लाख राउंड करता येतील. कमी पल्ल्याची आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवण्यात येणार. अदानी डिफेन्सने यापूर्वी ड्रोन, ड्रोनविरोधी यंत्रणा, लाइट मशीन गन, असॉल्ट रायफल आणि पिस्तूल तयार केल्या होत्या.
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे ध्येय
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod) यांनी संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. संरक्षण क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. यासाठी संरक्षण क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सच्या व्यवसायासाठी मार्ग खुले करण्यात आले आहेत. अदानी समूह, टाटा समूह, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्रा समूह भारतीय लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करत आहेत. अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी संचालक करण अदानी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील परकीय अवलंबित्वामुळे भारतीय लष्कराच्या गरजा वेळेवर पूर्ण होत नाहीत. याशिवाय आर्थिक संधीही कमी आहेत.
महत्वाच्या बातम्या: