जुलै महिन्यात शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची 4,989 कोटी गुंतवणूक
Stock Market: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) सलग नऊ महिने विक्री केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात परतले आहेत.
Stock Market: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) सलग नऊ महिने विक्री केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात परतले आहेत. जुलैमध्ये एफपीआयने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डॉलर निर्देशांकातील नरमाई आणि कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालानंतर एफपीआय पुन्हा एकदा खरेदीदार बनले आहेत. यापूर्वी जूनमध्ये एफपीआयने शेअर्समधून 50,145 कोटी रुपये काढले होते. मार्च 2020 नंतर एका महिन्यात काढलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. त्यावेळी FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 61,973 कोटी रुपये काढले होते.
खरंतर अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर पुन्हा वाढवले आहेत. त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होऊन बाजार पुन्हा गटांगळ्या खाईल अशी अपेक्षा होती. परंतु काही संस्थांनी महागाई आणि आर्थिक स्थितीताबाबत भारताला विशेष फटका बसणार नाही असे संकेत दिले होते आणि भारताने महागाई बऱ्यापैकी आटोक्यात ठेवल्याने परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले परिणामी बाजारात परिस्थिती सकारात्मक दिसून आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात
ऑगस्टमध्येही एफपीआयचा प्रवाह सकारात्मक राहील. याचे कारण म्हणजे रुपयाची सर्वात वाईट वेळ निघून गेली आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतीही एका श्रेणीत व्यवहार करत आहेत. याशिवाय भारतीय कंपन्यांचे तिमाही निकालही चांगले आले आहेत असं इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, येस सिक्युरिटीजचे हितेश जैन, प्रमुख विश्लेषक यांना विश्वास आहे.
जुलैमध्ये एफपीआयने कर्ज किंवा रोखे बाजारातून 2,056 कोटी रुपये काढले. पुढे जाऊन एफपीआयचा दृष्टिकोन काय असेल हे सांगण्यास थोडा वेळ लागेल, असं असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टार इंडियाचे हिमांशू श्रीवास्तव यांचे मत आहे.
एफपीआय गेल्या नऊ महिन्यांपासून विक्रेते
डिपॉझिटरी डेटानुसार, जुलैमध्ये FPIs ने भारतीय शेअर बाजारात 4,989 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. महिन्यातील नऊ दिवस तो शुद्ध खरेदीदार होता. यापूर्वी, सलग नऊ महिने एफपीआय विक्रेते होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या वर्षी जूनपर्यंत त्यांनी भारतीय शेअर बाजारातून 2.46 लाख कोटी रुपये काढले आहेत.