कोण होणार यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'?
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर चिखलफेक सुरु असताना, राज्यातल्या कुस्तीशौकिनांच्या ओठांवर मात्र सध्या एकच प्रश्नय... कोण होणार महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्राच्या गावागावातल्या आखाड्यात लंगोट कसून लाल मातीत शड्डू ठोकणाऱ्या पैलवानांच्याही डोक्यात सध्या एकच प्रश्नय... कोण होणार महाराष्ट्र केसरी?
महाराष्ट्र केसरी म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्तीतला सर्वात प्रतिष्ठेचा किताब. राज्यातल्या या सर्वात प्रतिष्ठेच्या किताबासाठी साताऱ्याचं छत्रपती शाहू क्रीडा संकुलही एव्हाना सज्ज झालंय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं हे अधिवेशन ६ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न होईल. यंदाच्या या महाराष्ट्र केसरीचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाच्या संकटामुळं तब्बल दोन वर्षांनंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या महासंकटात महाराष्ट्रातल्या कुस्तीची पार वाताहात झाली. कारण कुस्ती हा कॉण्टॅक्ट स्पोर्टस किंवा दोन पैलवानांमध्ये शारीरिक संपर्क होणारा क्रीडाप्रकार आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा हा सर्वात लाडका खेळ निर्बंधांच्या बेडीत अडकला होता. पैलवानांनी आपापल्या गावांमधून किंवा तालमींमधून मेहनतीत कसूर केलेली नाही. पण त्याच पैलवानांना तयारीच्या दृष्टीनं गेली दोन वर्षे यात्रांमधून किंवा ग्रामोत्सवांमधूनही कुस्त्या मिळालेल्या नाहीत, हे त्यांचं दुर्दैव म्हणायला हवं. म्हणूनच मलाही प्रश्न पडलाय की, कोरोना संकटाच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरी किताबाचा यंदा मानकरी कोण होणार?
महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीतलं यंदाचं सर्वात मोठं नाव होतं ते शिवराज राक्षेचं. पण कुस्तीशौकिनांच्या दुर्दैवानं पुणे जिल्ह्याच्या या पैलवानाला खांद्याच्या दुखापतीमुळं स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. नुकत्याच झालेल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराजनं १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. जागतिक रॅन्किंग कुस्ती स्पर्धेतही त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून आपला दर्जा दाखवून दिला. त्यामुळं शिवराज राक्षेला महाराष्ट्र केसरीत खेळण्याची संधी मिळाली तर त्याचं आव्हान नक्कीच तगडं ठरलं असतं. शिवराज राक्षेइतकीच २०१९ सालचा उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि अनुभवी माऊली जमदाडे हे दोघंही दुखापतीमुळं यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाहीत.
महाराष्ट्र केसरी किताबासाठीची कुस्ती ही माती आणि मॅट या विभागातल्या विजेत्या पैलवानांमध्ये होत असते. शिवराज राक्षे हा मॅटवरचा पैलवान आहे. त्याच्या अनुपस्थितीत गतविजेत्या हर्षवर्धन सदगीरसमोरचं आव्हान तुलनेत सोपं झालं, असं म्हटलं वावगं ठरणार नाही. शिवराजच्या साथीनं हर्षवर्धननंही यंदाची सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवली. शिवराज हा १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, त्याचवेळी हर्षवर्धननंही ९७ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. गेल्या काही महिन्यांपासून तो सातत्यानं राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाला आहे. त्या अनुभवाचा फायदा हर्षवर्धनला नक्कीच होऊ शकेल.
योगायोगाची गोष्ट म्हणजे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघंही अर्जुनवीर काका पवार यांचेच चेले आहेत. आता शिवराजच्या अनुपस्थितीत मॅट गटातून लातूरचा सागर बिराजदार, बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि कोल्हापूर शहरचा कौतुक डाफळे हेही महाराष्ट्र केसरीची फायनल गाठण्यासाठी उत्सुक असतील.
महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत माती विभागामधून पहिलं मोठं नाव आहे ते वाशिमचा पैलवान सिकंदर शेखचं. भारतीय सेनादलात बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपचा जवान असलेला हा पठ्ठ्या मातीतला तुफानी मल्ल म्हणून केवळ राज्यातच नाही, तर देशात ओळखला जातो. २०१९ साली सिकंदरनं सीनियर राष्ट्रीय, आंतरविद्यापीठ कुस्ती आणि २३ वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदकांची कमाई केली होती. इतकंच काय, पण गेल्या दोन वर्षांत त्यानं देशातली कुस्तीची मैदानंही गाजवली. जसापट्टीसारख्या नावाजलेल्या पैलवानाशी तो हरला, पण त्याआधी जसापट्टीलाही त्यानं घाम फोडला होता.
त्यामुळं माती विभागातून महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत सिकंदर शेखचं नाव आघाडीवर असणं स्वाभाविक आहे. त्याच्याच बरोबरीनं महाराष्ट्राचा लाडका पैलवान किरण भगत हाही त्या शर्यतीत असेल. गेली तीनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर असलेला किरण दिल्लीतल्या छत्रसाल आखाड्यात घाम गाळत होता. महाराष्ट्रातल्या मैदानांमध्ये त्यानं नुकतीच आपल्या तयारीची झलक दाखवली. किरण भगत हा मूळचा साताऱ्याच्या माणमधल्या मोहीचा पैलवान आहे. त्यामुळं साताऱ्यातल्या महाराष्ट्र केसरीत स्थानिक प्रेक्षकांकडून सर्वाधिक पाठिंबा हा किरण भगतच्या पाठीशी असेल.
माती विभागातून महाराष्ट्र केसरीचा दावेदार असलेला आणखी एक पैलवान म्हणजे बाला रफिक शेख. बाला हा मूळचा सोलापुरातल्या करमाळ्याचा. वस्ताद गणेश दांगट यांच्या पुण्यातल्या हनुमान आखाड्यात तो सराव करतो. पण तोच बाला महाराष्ट्र केसरीत प्रतिनिधित्व बुलढाण्याचं करतो. २०१८ साली त्यानं अभिजीत कटकेला हरवून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची क्षमता बाला रफिक शेखमध्ये निश्चितच आहे.
सोलापूर जिल्ह्याकडून माती विभागात खेळणाऱ्या महेंद्र गायकवाडवरही जाणकारांचं लक्ष राहिल. नुकत्याच झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली होती. या स्पर्धेच्या फायनलमध्ये महेंद्रनं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनिरुद्धकुमारला हरवण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळं महाराष्ट्र केसरीच्या शर्यतीत महेंद्र गायकवाडचंही नाव घेण्यात येत आहे. त्याशिवाय पृथ्वीराज मोहोळ, आदर्श गुंड, गणेश जगताप आणि संतोष दोरवड आदी पैलवानांमध्येही महाराष्ट्र केसरीत चमत्कार घडवण्याची क्षमता आहे.
एकंदरीत काय, तर साताऱ्याच्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं राज्यातल्या पैलवानांना दोन वर्षांनी एक मोठी संधी मिळणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेला महाराष्ट्राचा पैलवान त्या संधीचं सोनं करण्यासाठी नक्कीच उत्सुक असेल.