BLOG | बंजारा समाजाची बदनामी कोण करतंय?
पोहरादेवीत जगदंबेची पुजा केली जाते...देवीची पुजा केली जाते, त्याच समाजात एक मुलगी जिवानीशी गेल्यावर ज्याच्यावर आरोप आहेत अशा व्यक्तीच्या स्वागतासाठी केवळ आपल्या जातीतला आहे म्हणून रेड कार्पेट टाकलं जात असेल तर ही आपल्या समाजाशी आणि इतिहासाची केेलेली गद्दारीच म्हणायला हवी..संपुर्ण बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी असल्याचा दावा करत बंजारा समाजाची बदनामी कोण करतंय....
संजय राठोडांनी पोहरादेवीत दर्शनाच्या नावाखाली शक्तीप्रदर्शन केलं. आपल्यावर होणाऱ्या आरोपांना त्यांनी जातीमागे, धर्मगुरुंमागे लपत स्वतःलाच क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला. पण वारंवार बंजारा समाजाचं नाव घेत आरोपांपासून, कर्तव्यापासून पळ काढण्याचा कोणी प्रयत्न करत असतील तर बहुधा संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीचा त्यांना विसर पडला असावा..
पोहरादेवीत जगदंबेची पुजा केली जाते...देवीची पुजा केली जाते, त्याच समाजात एक मुलगी जिवानीशी गेल्यावर ज्याच्यावर आरोप आहेत अशा व्यक्तीच्या स्वागतासाठी केवळ आपल्या जातीतला आहे म्हणून रेड कार्पेट टाकलं जात असेल तर ही आपल्या समाजाशी आणि इतिहासाची केलेली गद्दारीच म्हणायला हवी.. संपुर्ण बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी असल्याचा दावा करत बंजारा समाजाची बदनामी कोण करतंय.... कारण सत्ता आणि धर्माच्या नावाखाली आपले हितसंबंध जपणारी काही निवडक मंडळी सोडली तर राठोडांचं कोणीही समर्थन करत नाहीये. अर्थात मतदारसंघातल्या कामांमुळे राठोडांचा दबदबा जरुर आहे पण म्हणून आरोप झाले की लगेच लपण्याचं पोहरादेवी हे ठिकाण नाहीये. इतकीच नैतिकता शिल्लक होती तर 16 दिवस तुम्ही शांत का होता?
त्यामुळे उगाच समाज पाठिशी असल्याचा आव त्यांनी आणि काही तथाकथिक महंतांनी आणू नये. बंजारा समाजाची भावना फार वेगळी आहे.
स्वतःला पोहरादेवीत यायचं म्हणून दुसरीकडे असलेल्या महंतांना जबरदस्ती कोणी बोलावलं?
बाबूसिंग महाराजांना या सगळ्या प्रकरणात अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का?
पोहरादेवी संस्थानच्या विकासासाठी राठोडांनी प्रयत्न केले तो थांबू नये म्हणून राठोडांना समर्थन देण्यासाठी कोणी दबाव टाकतंय का?
पोहरादेवी संस्थानसारख्या पवित्र ठिकाणी केवळी सत्ता आहे म्हणून आरोपांची शहानिशा न करताच राठोडांना व्यासपीठ देण्याची इतकी घाई का?
संजय राठोड आणि परळीतल्या तरुणीचे कसल्याच प्रकारचे संबंध नव्हते का, याबाबत तथाकथित महंतांची भूमिका काय?
समाजातला नेता म्हणून संजय राठोड तुम्हाला महत्वाचे वाटतात तर परळीतली तरुणी का जिवानीशी गेली, आत्महत्या असेल तर त्यामागचं काय कारण हे सुद्धा प्रश्न विचारावेशे वाटत नाहीत का?
काँग्रेसकडून राजकारणात पद भोगलेले एक तथाकथित महाराज चौकशीआधीच राठोडांची सतत बाजू का घेतायत?
अश्या अनेक प्रश्नांची चर्चा आता होतेय.....
बंजारा समाजातून आलेल्या सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक यांनी राज्याचं नेतृत्व केलं. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भुषवलं आणि विदर्भातल्या या भागाला सहकार क्षेत्राचं स्वरुप देत विकासाचा प्रयत्न केला....त्यानंतर त्यांचा राजकिय वारसा मनोहर नाईकांनी जपला...बंजारा समाजाला ओळख, नेतृत्व आणि राजकीय अवकाश देण्याचं काम हे खऱ्या अर्थाने नाईक कुटुंबियांनी केलंय. त्यामुळे बंजारा समाजाचं नेतृत्व नाईकांकडेे होतं. पण मनोहर नाईक प्रकृतीच्या कारणामुळे सक्रीय राजकारणातून थोडे बाजुला झाले आणि त्यांनी आपला मुलगा इंद्रनिल नाईक यांना वारसदार म्हणून घोषित केलं. तोपर्यंत बंजारा समाजाचं नेतृत्व नाईकांकडेच होतं संजय राठोडांकडे नाही. नाईकाच्या निवासस्थानाला त्या भागात बंगला म्हटलं जातं. बंजारा समाजातल्या महत्वाच्या सगळ्या बाबींवरची सुत्र एकेकाळी बंगल्यातून हालायची. पण सर्वसामान्यांना बंगल्याचा अॅक्सेस कमी होत गेला असं स्थानिक बंजारा समाजातल्या नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे पुढचं बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे समाज बघायला लागला. वास्तविक आता मनोहरराव नाईकांचे सुपुत्र इंद्रनिल नाईक हे पुसद मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आपल्याच समाजातली एक मुलगी जिवीनीशी जाते अश्यावेळी समाजाचा एक घटक म्हणून इंद्रनिल नाईकांनीही तात्काळ भूमिका घेणं अपेक्षित होतं जी त्यांनी शेवटपर्यंत घेतली नाही. ..याच मतदारसंघात भाजपचे निलय नाईक हे देखील आमदार आहे. पण त्यांना देखील हा मुद्दा आक्रमकपणे पुढे न्यावा इतका महत्वाचा वाटला नसावा. भाजपचेच नेते याबाबत आंदोलन करत असताना निलय नाईक मात्र अगदी भूमिगत झाल्यासारखे या मुद्यापासून दूर होते. संजय राठोडांवर गंभीर आरोप होतात. समाजातल्याच एका मुलीचा मृत्यू होतो. त्याचवेळी राठोडांना संपुर्ण बंजारा समाजाचे नेते म्हणत वाचवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांच्यावर कारवाईने बंजारा समाज नाराज होईल अशी वावडी उठवण्याचा प्रयत्न होत होता...तेव्हाच बंजारा समाजाचे घटक म्हणून इंद्रनिल नाईक, निलय नाईक, हरिभाऊ राठोड या सगळ्या नेत्यांनी समोर येत भूमिका मांडण अपेक्षित होतं. पण मृत मुलीसाठी आवाज उठवण्यापेक्षा यांनी स्वतः सोयीस्कर मौन बाळगलं. नेतृत्त्व म्हणून समाजातल्या सर्वसामान्य व्यक्तीसोबत, विवेकासोबत, न्यायासोबत उभं राहणं म्हणजे खरं नेतृत्व असतं. नाहीतर नुसत्या वारश्यात मिळालेली सत्ता पदं फार काळ टिकत नसतात. गंभीर आरोप संजय राठोडांवर होते, संशयाचं धुकं होतं...यावेळी संजय राठोड बंजाऱ्यांचं नेतृत्व करतात असं कोणी म्हणत असेल तर तर ति खरी बंजारा समाजाची बदनामी होती..पण तेव्हाही ज्या समाजाने यांना सत्ता दिली ते स्थानिक नेते मौनच होते.....फार पुर्वीपासून तांड्यावर न्याय देण्याचं काम तांड्याचे नाईक करत होते पण ज्यांच्या नावात नाईक असून सुद्धा जे अन्यायाबद्दल गप्प होते अश्या नेत्यांनी संत सेवालाल महाराजांची शिकवणुक वाचावी, आठवावी...
जे कपट वाचा लेन आये पाप ओरे सोबत जाये यम घरेरो फासो ओरे गळेमं पडिये नव मंणेरी काया ओरी नरकेम मळजाये लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये....
आणि केवळ आपल्या जातीचे आहेत म्हणून कुठलाही बंजारा व्यक्ती त्यांच्या पाठीमागे उभा राहत असेल तर त्याने बंजाऱ्यांचा इतिहास पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे. ब्रिटीशांनी बंजारा समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला होता.. 1871 साली कायदा करत बंजाऱ्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न झाला. तो पुसण्यासाठी बंजाऱ्यांनी खुप प्रयत्न केले...आणि गुन्हेगारीचा शिक्का पुसत हा समाज स्थिरावला आणि विकासाच्या मुख्य प्रवाहातही सामील झाला. त्यामुळे उगाच जातीच्या नावाखाली कोणता नेता आपला वापर करतोय का.....हा विचार प्रत्येकाने करायला हवा. आजही गावापासून दूर तांड्यामध्ये राहणारा समाज हा मनाने भोळा, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. चुकीची माहिती देऊन त्यांना कोणाच्याही पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न होत असेल तर बंजारा समाजातल्या सुज्ञांनी असले प्रयत्न हाणून पाडायला हवे. नाहीतर याने समाज म्हणून आपलीच प्रतिमा मलिन होईल. गुन्हेगारीचा शिक्का ज्या समाजाने आपल्या कर्तृत्वाने पुसला तोच समाज गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मागे उभा राहणार नाही याची मला खात्री आहे.....
त्यामुळे पोहरादेवीसारख्या पवित्र धर्मपीठात नगाडे, रेड कार्पेट, गुलाल हे सगळं आपण कोणासाठी करतोय....जी मुलगी जीवानीशी गेली तिच्यासाठी की ज्याच्यावर आरोप आहे त्या मंत्र्यासाठी..संजय राठोड दोषी असो किंवा नसो पण प्रश्न उरतो तो म्हणजे समाज म्हणून आपण कोणाच्या पाठीमागे उभं राहतोय....... तपासानंतर संजय राठोड दोषी आहेत कि नाही हे सिदध होईलच म्हणून कुठल्या प्रवृत्तीच्या मागे आपण उभं राहतोय हा प्रश्न आपण स्वतःला समाज म्हणून विचारायला हवा. जी मुलगी जीवानीशी गेली तिच्याबद्दल काहीच न बोलता मातब्बर नेत्याच्या मागे उभं राहणाऱ्या धर्माच्या समाजाच्या ठेकेदारांनाही आपण प्रश्न करायला हवे... नाहीतर उद्या तुमच्या घरातल्या आई बहिणींसोबत असं घडलं तर तुमच्या हाकेला ओ द्यायला, तुमच्या सोबत उभं राहायला कोणीच नसेल..... जात म्हणून आपण समाजतल्या शोषित, वंचित, पिडित घटकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. ना की धर्म आणि सत्तेच्या आड लपणाऱ्या ठेकेदारांसोबत.... मला खात्री आहे सुधाकर आणि वसंतराव नाईकांनी नेतृत्व केलेला बंजारा समाज असल्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मागे उभा राहणार नाही. जातीच्या समाजाच्या, तथाकथित बुवांच्या बुरख्याखाली लपणाऱ्या गुन्हेगारांच्या मागे तो कधीही उभा राहणार नाही. कारण संत सेवालाल महाराजांची शिकवण तो कधीही विसरणार नाही.... कारण संत सेवालाल महाराजच म्हणतात....
करिय चिर खाय कोरी, हात आये हथकड़ी पगेमाई पड़ीये बड़ी, डोरी डोरी हिडिये
त्यामुळे बंजारा समाजाची बदनामी होऊ द्यायची नसेल तर आपण सत्यासोबत, देशाच्या संविधानासोबत, न्यायासोबत, समाजातल्याच पीडित महिलांसोबत उभं आहोत हे दाखवण्याची गरज आहे. नाहीतर गुन्हेगारी प्रवृत्तीला टाकलेली रेड कार्पेट एक दिवस आपल्याच आय बहिणींच्या गळ्यातला फास बनायला वेळ लागणार नाही....
जय सेवालाल