BLOG : कलेची जाण, समाजभान यांचा संगम; लावणीसम्राज्ञीला नामवंतांकडून शब्दांजली
BLOG : ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’ या आणि अशा असंख्य लावण्यांना आपल्या आवाजाच्या लावण्याने खुलवणारा एक आवाज शांत झाला. गिरगावकर आणि संगीतप्रेमींच्या लाडक्या माई अर्थात लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांचं आज आपल्यात नसणं जसं रितेपणाची जाणीव करुन देतंय. तसंच त्यांनी आपलं आयुष्य अनेक अजरामर गीतांनी भरुन आणि भारून ठेवलंय याचीही साक्ष आपल्याला देतंय.
त्यांना आदरस्थानी मानणारे अनेक कलाकार आहेत, लोककला अभ्यासक, कलाकार गणेश चंदनशिवे हे त्यापैकीच एक. त्यांच्याशी माईंच्या आठवणी जागवण्याकरता संवाद साधला, तेव्हा कलाकार आणि माणूस म्हणून माईंचं श्रेष्ठत्व त्यांनी उलगडून सांगितलं.
ते म्हणाले, मी 10 जानेवारी 2006 ला मुंबई विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झालो, तेव्हा माईंचे पुत्र ढोलकीवादक विजय चव्हाण तिकडे लोककला विभागात शिकवत होते. त्यावेळच्या वार्षिक समारंभात मी माईंना पहिल्यांदा भेटलो. त्या समारंभाला माई, तसंच ‘जांभूळ आख्यान’ने तुमच्या आमच्या मनात घर करणारे लोकशाहीर विठ्ठल उमप आणि ‘महाराष्ट्र की लोकधारा’ जगभरात पोहोचवणारे शाहीर साबळे अशी तीन दिग्गज मंडळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. मी या दिग्गजांच्या समोर सादरीकरण करताना खूपच बुजलेला होतो. कार्यक्रमाची सुरुवात माझ्या गणाने झाली.
तेव्हा माईंनी मला जवळ बोलवून माझ्याबद्दल विचारलं. माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता. मी गाण्याचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही, तसंच त्यांनीही ते घेतलेलं नव्हतं, असं मला त्यांच्याशी बोलताना कळलं. आमच्या पिढीचे तीन आदर्श त्या कार्यक्रमात भेटल्याने मलाही भरुन आलं होतं. तीन दिग्गजांना भेटण्याचा तो अनुभव माझ्या आयुष्यात मी कधीही विसरु शकत नाही.
त्या कार्यक्रमापासून माईंशी नातं जुळलं ते कायमचं. पुढे त्यांच्या घरातल्या नवरात्रीत देवीसमोर गोंधळ सादर करण्यासाठी त्या मला निमंत्रित करत. मी किमान 10 वर्षे त्यांच्या गिरगावातील घरी हा गोंधळ सादर केलाय. एव्हाना मी त्यांच्या कुटुंबातलाच एक सदस्य झालो होतो.
मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गोंधळ सादर करायला जायचो, तेव्हा तेव्हा कलाकार म्हणून माझं आदरातिथ्य होत असे. मला प्रत्येक वेळी एक पोशाख त्या भेट म्हणून देत असत. पुढे विजय चव्हाणांच्या मुलाच्या म्हणजे माईंच्या नातवाच्या लग्नातही मी घरच्यासारखाच वावरलो, इतकं प्रेम मला माई आणि विजय चव्हाणांनी दिलंय. मीही माईंच्या वाढदिवसाला त्यांना साडी घेऊन जायचो. माई मला आईच्याच स्थानी होत्या आणि कायम माझ्या मनात त्यांच्यासाठी तेच स्थान राहील.
त्यांचं लोककलेतलं किंवा संगीतातलं योगदान याविषयी बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील. माईंनी ज्या काळात आपली कारकीर्द घडवली, त्या काळात समाजाचा लोककलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यावेळी माईंनी लावणीला संस्कारक्षम बैठक दिली. लावणीच्या डोक्यावरचा पदर ढळू न देता ती जगभरात पोहोचवण्याचं त्यांचं योगदान मोठं आहे. माईंनी गाण्यातल्या शब्दांचं वैभव आपल्या आवाजाने खुलवलं. मग ती लावणी असो वा अन्य गीतं. त्या केवळ लावणी आणि मराठीतच गायल्यात असं नाही, तर हिंदी, पंजाबी, उर्दू, गुजराती, अरेबियन, तामिळ आदी भाषांमध्ये त्यांचं मोलाचं सांगीतिक योगदान आहे. हिंदीमध्ये सी. रामचंद्र यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांकडे त्या गायल्यात.
लावणी गाण्याचं त्यांचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी खेबूडकरांसारखी मंडळी जी ताकदीने लावणी लिहायची किंवा राम कदमांसारखे संगीतकार जे त्याला तितकीच कसदार चाल लावायचे. त्या शब्दांचं आणि त्या चालीतली सौंदर्यस्थळं ओळखून माई गायच्या. त्यामुळे 60 च्या दशकात त्यांनी गायलेल्या लावण्या आज 2022 मध्ये फाईव्ह जीच्या युगातही आपल्या वाटतात. आजच्या गाण्यांच्या कार्यक्रमात, किंवा संगीत स्पर्धेत लावणी गायची असेल तर माईंची एकतरी लावणी त्यात समाविष्ट असतेच. हे माईंनी आपल्याला दिलेलं देणं आहे. दांगट शाहीरी बाज आणि गोड गळ्याचा साज यांचा संगम अर्थात कृष्णा-कोयनेचं मीलन म्हणजे सुलोचना चव्हाण यांचा आवाज. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’ सारखं गीत ज्यातून ग्रामीण भागातील मुलीला आपलं चारित्र्य जपायला माई त्या गीतातून सांगतायत. हे संस्कार त्यांनी आपल्या लावणीतून जपलेत. त्यातला सामाजिक आशय त्यांनी कायम जिवंत ठेवलाय. त्यांचं हे गीत माझ्याही आवडीचं आहे.
कलावंताने आपल्याकडे आहे ते भरभरून आणि निरपेक्ष वृत्तीने लोकांना द्यावं, त्याने तुमच्यात भरच पडत जाते. हा विचार माई त्यांच्या कारकीर्दीत अखंड जगल्या. महाराष्ट्रातील अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, जालना यासारख्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमानिमित्ताने त्या जात असत. तिथल्या अनेक संस्था, शाळा, मंदिरं यांना माईंनी मदतीचा हात पुढे केलाय. काही ठिकाणी तर आपल्या कार्यक्रमाच्या मानधनाची पूर्ण रक्कमही दान केली आहे.
अगदी अलिकडच्या काळात त्यांनी माथेरानजवळील दिव्यांगांच्या एका संस्थेला भरीव मदत केलीय. विजय चव्हाण आणि मी लोणावळ्यातल्या वृद्धाश्रमात जाऊन कार्यक्रम सादर केलेत, ही माईंची शिकवण. त्यांनी आमच्यात केवळ गाणंच रुजवलं नाही तर, आमच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची बीजंही रोवली. मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी अनेक विदयार्थी येतात, ज्यांची आर्थिक स्थिती बेताची असते. त्या मुलांना मदत करण्याची प्रेरणा ही मला त्यांच्याकडूनच मिळाली.
माई आज फक्त शरीराने आपल्यातून गेल्यात. त्यांच्या स्मृती, अनेक आठवणींचा खजिना, त्यांचा तो मनाचा ठाव घेणारा आवाज कायम आमच्यासोबत, नव्हे आपल्या सर्वांच्या सोबत राहणार आहे. त्या आईच्या मायेने लाड करायच्या, तशा आईच्या अधिकाराने कानही उपटायच्या. तो माझ्या डोक्यावरचा हात आज निघून गेलाय. मला त्या ‘चंदन’ अशी हाक मारत, ती हाक आता ऐकू येणार नाही, ही पोकळी कायम जाणवेल.
ख्यातनाम गायक नंदेश उमपदेखील माईंबद्दल बोलताना भावूक झाले. ते म्हणाले, मी बाबांबरोबर लहानपणी जेव्हा कार्यक्रमाला जायचो, तिथेच मी माईंना पहिल्यांदा भेटलो. ही अनेक वर्षांची ओळख, हे अनेक वर्षांचं नातं होतं.
कलेबद्दल त्यांचं प्रेम, त्यांची निष्ठा अपार होती. आमच्या आणि नंतरच्या पिढीनेही ही गोष्ट घेण्यासारखी आहे. एक चांगला कलाकार होताना तुम्ही चांगला माणूस होणं हे फार गरजेचं आहे. हे त्यांनी कायम आमच्या मनावर ठसवलंय. सामाजिक बांधिलकी जपत कला जोपासण्याचं व्रत त्यांनी घेतलं आणि ते पार पाडलं.
त्यांच्या गायकीबद्दल एकच सांगतो, त्यांची लावणी गाण्याची जी लकब होती, आवाजातला जो ठसका होता, तो मला खूप भावायचा. तो कायम कानात आणि मनात घुटमळत राहील. त्यांचा आवाज हा एक्स्क्लुझिव्ह होता. त्यांची ती ढब आणि त्यांची कलेप्रती, समाजाप्रती असलेली आस्था हे आजच्या पिढीने आत्मसात करावं, असं मला आवर्जून वाटतं.
गणेश चंदनशिवे आणि नंदेश उमप यांनी माई अर्थात सुलोचना चव्हाण यांचं व्यक्तिमत्त्व उलगडलंच.पण, एक गिरगावकर म्हणून जाता जाता मला इथे एक आठवण सांगावीशी वाटते. ती म्हणजे आम्ही ‘गिरगाव कॅलेंडर 2020’ अर्थात ‘आपलं गिरगाव’ हे जेव्हा अरुण पुराणिक आणि दिलीप ठाकूर या दोन ज्येष्ठांसोबत साकारलं, तेव्हा माईंना गिरगावबद्दलच्या भावना विचारल्या होत्या. त्यावेळी अवघ्या एका वाक्यात गिरगावचं समर्पक वर्णन माईंनी केलं होतं. त्या म्हणाल्या, मुंबई हे जर महाराष्ट्राचं नाक असेल तर गिरगाव ही मुंबईच्या नाकातली नथ आहे.
गाण्यातलं परफेक्शन आणि शब्दांचा नेमकेपणा साधणाऱ्या माईंना याचवर्षी 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला, तेव्हाही त्या भावूक झाल्या होत्या. पती शामराव चव्हाण यांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता. हे सगळे क्षण मनात दाटून आलेत.
काल माईंची अंत्ययात्रा गिरगावातील फणसवाडीतून निघाली. तेव्हा त्यांना पोलिस पथकाने दिलेली मानवंदना पाहून उर भरून आला. त्यांचं पार्थिव स्मशानाकडे निघालं. यावेळी नंदेश उमप, गणेश चंदनशिवे यांसारख्या नामवंत कलाकारांपासून जनसामान्यही त्यांच्या पार्थिवासोबत होते. पावलं जड झाली होती. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. माईंच्या गीतांनी आपल्याला आयुष्यभर साथ दिलीय, देत राहतील. त्यांच्या अखेरच्या प्रवासात आम्ही जणू त्यांची साथ करत होतो. त्यांचा आवाज कानात आणि मनात साठून अनेकांना भरून येत होतं.
त्यांच्या लावण्यांनी आमची वेदना, दु:खं आम्हाला विसरायला लावलीत. आमचे अनेक क्षण त्यांच्या खणखणीत आवाजाने व्यापून टाकलेत. गणेश चंदनशिवे म्हणाले, त्यानुसार माई फक्त शरीररुपाने आपल्यातून गेल्यात. त्यांचं चिरकाल टिकणारं गाणं, त्यांची आपल्यावर असलेली माया, त्यांचा हसरा चेहरा हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं वैभव आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हा ठेवा आपल्या सर्वांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम सोबत राहील.
माईंनी गिरगावला ‘नथी’ची उपमा दिली, त्यांचेच शब्द पुढे नेताना असं म्हणावंसं वाटतं, माई अर्थात लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण हा संगीतविश्वातला असा दागिना आहे, जो जगभरातल्या संगीतरसिकांच्या आयुष्याला आपल्या गीतांनी सजवणारा आहे आणि सजवत राहणारा आहे. माईंच्या स्मृतींना वंदन आणि विनम्र आदरांजली.