एक्स्प्लोर
अरुण काकडे : प्रायोगिक रंगभूमीचं पर्व
काकडे काका गेल्याची बातमी मोबाईलवर फिरली. अर्थात त्याची खातरजमा करुन घ्यावी लागते. त्यासाठी आविष्कारच्याच रवीला फोन केला. रवी म्हणाला, हो.. मी चाललो आहे तिकडेच. मी म्हणालो, अंत्यसंस्कार कुठे करणार? खरंतर ज्या माहीमच्या शाळेत काकडे काकांनी नाट्यधर्म जिवंंत ठेवला तिथे त्यांना शेवटी नेणार आहेत का? रवी म्हणाला, तिथे कसं नेणार.. ती आता आपली जागा नाही.
'गेल्या जवळपास साठेक वर्षांपासून आविष्कार काम करते आहे. पण आता स्थिती गंभीर आहे रे. आम्हाला ही शाळेची जागा सोडायला सांगितली आहे. सर्वच सरकारी शाळांमधल्या इतर कार्यांना आता मज्जाव घातलाय. पण मुद्दा असा की आता जायचं कुठे? या विंगा, ही प्रॉपर्टी हे सगळं कुठे घेऊन जायचं सांग. आणि मुद्दा फक्त आविष्कारचा नाहीय. आज या निमित्ताने दादरसारख्या भागात काहीतरी प्रायोगिक काम चालू आहे. आम्ही शक्यतो प्रयोग इथे करत असतो. पण मुळातच प्रायोगिक नाटकवाल्यांना व्यासपीठ हवं. ते कधी मिळणार? सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्कात आहेच मी. ते मदत करणार आहेत, पण यावर लवकर तोडगा निघायला हवा,' असे काहीसे हतबल उद्गार होते ९४ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांचे.
जवळपास सहा दशकं आविष्कारसोबत काकडे काका काम करत होते. छबिलदासच्या चळवळीपासून पालिका शाळेतल्या प्रयोगांपर्यंतचं सगळं व्यवस्थापन काकडे काका करायचे. अगदी अलिकडेपर्यंत सादर होणाऱ्या प्रयोगांआधी टेबलावर तिकीटांपाशी काकडेकाका बसलेले असायचे अत्यंत शांत चित्त आणि कमालीच्या चिकाटीने काकडेकाकांनी आविष्कार सुरु ठेवली. अरविंद-सुलभा देशपांडे, सत्यदेव दुबे, रोहिणी-जयदेव हट्टंगडी, विजय तेंडुलकर, चेतन दातार, गिरीश पतके, रवी सावंत यांच्यापासून अगदी चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, विश्वास सोहोनी, सुषमा देशपांडे आदी अनेकांसोबत काकडे काकांनी जुळवून घेतलं आणि संस्था सुरु ठेवली. त्यांनी अभिनय केला नाही अशातला भाग नाही. काही नाटकं, एकांकिकांमधून त्यांनी उत्तम अभिनय केल्याचं आविष्कारची मंडळी सांगतात. पण नंतरच्या काळात संस्थेला असलेली गरज लक्षात घेऊन काकडे काका या संस्थेचे संयोजक, समन्वयक बनले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नाट्यपरिषदेनं नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणूनही नियुक्त केलं. ९४ व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी उपलब्ध असलेल्या व्यासपीठाबाबात.. बालरंगभूमीबाबत आपली ठोस मतं मांडली होती. एकीकडे अध्यक्षपदाची माळ गळ्यात आल्यानंतरही अत्यंत शांतपणे काकडे काकांनी प्रायोगिक रंगभूमीबद्दलची आपली मतं मांडली होती. कारण काका थेट रंगभूमीवर जरी कार्यरत नसले तरी भारतभरातल्या प्रायोगिक संस्थांशी त्यांचा संपर्क होता. या निमित्ताने, संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीला काकडे काका माहित होते. म्हणूनच काकडे काकांना प्रायोगिक रंगभूमीचं पर्व म्हटलं तर वावगं ठरु नये.
एकीकडे यशवंत नाट्यसंकुलात बालरंगभूमीसाठी झालेलं आंदोलन होतं. ज्यात तेंडुलकरांपासून दामू केंकरे, अरुण काकडे, सुलभा देशपांडे अशी नामी मंडळी सहभागी झाली होती. तत्कालीन अध्यक्ष मोहन जोशी यांनी नाट्यसंकुलात बालरंगभूमीसाठी जागा द्यावी यासाठी केलेल आंदोलन होतं ते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी काकडे काका आविष्कारच्या जागेबद्दल बोलत होते. इथे होणारं काम.. येणारी नाटकं.. येणारे रंगकर्मी यांना मिळणारी जागा.. मिळणारं व्यासपीठ याबाबत ते सतत चिंतातूर होते.
अगदी शेवटी शेवटी पालिका शाळेतल्या एका वर्गात आविष्कारचं सगळं सामान ठेवण्यात आलं होतं. तिथल्याच मधोमध ठेवलेल्या टेबलाजवळ दोन खुर्च्या मांडल्या गेल्या होत्या. एकावर काकडे काका बसले होते आणि दुसरीवर कॉम्प्युटरसमोर आणखी एखादा संस्थेचा शिलेदार बसलेला असायचा. पण तशाही जागेत काकडे काका नव्या जागेबद्दल संस्थेच्या पुढच्या नाट्यप्रयोगाबद्दल बोलत असायचे. जोवर शक्य आहे तोवर काम करत रहायचं असं ते अगदी प्रेमानं सांगत होते.
अर्थात आपल्या आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी केलेली मोठी सोय म्हणजे, त्यांचं पुस्तक. अमका. यात त्यांनी आपला प्रवास मांडला आहेच. पण वयाच्या नव्वदीतही त्यांचा उत्साह थक्क करणारा होता. या ऊर्जेचं आपण काय करायचं हा प्रश्न आहे. अर्थात रवी सावंतसारखी मंडळी आविष्कारमध्ये आजही काम करताहेत. पण हा सगळा अट्टहास ज्यासाठी चाललाय त्या प्रयोगिक रंगभूमीसाठी हव्या असणाऱ्या व्यासपीठाचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे.
आणखी एक..
काकडे काका गेल्याची बातमी मोबाईलवर फिरली. अर्थात त्याची खातरजमा करुन घ्यावी लागते. त्यासाठी आविष्कारच्याच रवीला फोन केला. रवी म्हणाला, हो.. मी चाललो आहे तिकडेच. मी म्हणालो, अंत्यसंस्कार कुठे करणार? खरंतर ज्या माहीमच्या शाळेत काकडे काकांनी नाट्यधर्म जिवंंत ठेवला तिथे त्यांना शेवटी नेणार आहेत का? रवी म्हणाला, तिथे कसं नेणार.. ती आता आपली जागा नाही.
पुढे आमचं संभाषण थांबलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement