Blog : तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा... तिच्यासाठी फक्त सोय असली तर हरकत काय?
तुला फक्त तू जन्म देतेस येथे,
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा!
सध्या एका चर्चेच्या विषयावरून आनंदी गोपाळ सिनेमातील 'तू आहेस ना' या गाण्यातील या ओळींची आठवण झाली. निसर्गाने स्त्री आणि पुरुष अशी दोन वेगळी माणसे तयार केली ती कशासाठी? कारण प्रत्येकाचे काहीतरी कर्तव्य आहेत. जी गोष्ट एखादी स्त्री करू शकते ते एक पुरुष करू शकत नाही. समानता, समान अधिकार वगैरे हवेतच पण मुळात पाळी येणं हे स्त्रियांच्या नशिबी आहे कारण ती जन्मदात्री आहे. पुढची पिढी घडवणे, हे तिच्या हातात आहे. तिला पुढची पिढी घडवण्याचं वरदान मिळालं आहे. तिला त्या दिवसांमध्ये होणारा त्रास हा देखील तिलाच भोगावा लागतो. पण हे समजून घेऊन किमान तिच्यासाठी त्या दिवसांमध्ये सुट्टीची सोय असणे यात चुकीचं काय?
अगं देवघरात जाऊ नकोस, घरकाम करू नकोस, पोट दुखत असेल तर आराम कर जरा असं कायम घरातले मोठे सांगत असतात. त्यांच्या या सांगण्यात काळजी असते.
आता काळानुसार गोष्टी बदलत चालल्या आहेत, आता स्त्रियांकडे त्या 4-5 दिवसांमध्ये घरी बसणे हा पर्याय नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रिया देखील घरातलं सगळं काम करून 10-12 तासांची कामावर जाऊन शिफ्ट पूर्ण करतात. पण पूर्ण अंग दुखत असतं म्हणून गोळ्या घेतात.
अजूनही अनेक घरांमध्ये कुठेतरी धर्माच्या नावाखाली मनात घातलेली भीती आहे. देवाचा कोप होईल, त्या दिवसांमधील रक्त अशुद्ध असतं, अन्न नासतं वगैरे वगैरे... अजूनही अनेक ठिकाणी हे सगळं मानलं जातं. आता वेगळ्या खोलीत बसवणे वगैरे प्रकार कमी झाले असले तरी काही घरांमध्ये अजूनही देवपूजा असली आणि घरातल्या कर्त्या स्त्रीची तेव्हा पाळी आली तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आणि तिच्या पण. मग पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या वगैरे घेतल्या जातात. त्या विषयावर नंतर बोलुयात.
स्मृती इराणी यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं की पाळी येणं म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे सुट्टी द्यायची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की पाळी येते तेव्हा साधारणपणे सगळ्याच महिलांना पहिल्या दोन दिवसात खूप त्रास होतो, पण सगळ्यांनाच होईल असं नाही. त्यामुळे सुट्टी घ्यावी की नाही? हा त्या महिलेचा प्रश्न असायला हवा. पण ती सोय करून द्यायला हरकत काय? दोन पेक्षा जास्त दिवस सुट्टी हवी असेल तर ती पगारी सुट्ट्यांमधून किंवा बिनपगारी सुट्ट्यांमधून घेतली तर यात कुणाला काय हरकत आहे? जसं आता महिला "पगारी सिक लिव्ह" घेतात तसचं पुढेही घेतील.
या माझ्या मताला खोडून काढण्यासाठी डिफेन्स म्हणून उत्तर दिलं की तुम्हाला समान हक्क हवे, स्त्रीदाक्षिण्याबद्दल तुम्ही बोलता, मग कशाला हवी वेगळी सुट्टी? नैसर्गिक गोष्ट आहे मग सवय झाली असेल तुम्हाला आतापर्यंत, मग कशाला सुट्टी? तुम्हाला आरक्षण हवं, तुम्हाला नोकऱ्या हव्यात, सरकारी नोकऱ्या देखील हव्यात, मग पाळी आली म्हणून सुट्टी घेणार, प्रेग्नंट आहे म्हणून सुट्टी घेणार, मग या कंपनीच्या मालकाने तुम्हाला का नोकरीवर घ्यायचे? असं अनेक पुरुषांनी मला सांगितलं, त्यांचं मत मांडलं. तुमच्या ठिकाणी तुम्ही योग्य असं म्हणून मी विषय सोडून दिला.
प्रश्न फक्त शारीरिक त्रासाचा नाहीचे मुळी. महिलांना त्या दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही त्रास होत असतात. मूड स्विंग होत असतात, पोटात दुखत असत, अशा परिस्थिती मध्ये आपल्यासाठी एक सोय आहे बाबा हे तिला माहीत असेल तर ती दुप्पटीने काम करेल, त्या दोन दिवसांचे काम पुढच्या एका दिवसात भरून काढेल.
अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या त्या दिवसांमध्ये सरसकट गोळ्या घेतात. डॉक्टरांना न विचारता पेन किलर घेतात कारण गोळी नाही घेतली तर साधं घरकामासाठी पण उभं राहता येणार नाही, असं अनेक महिला म्हणतात. पण या गोळ्यांचे साईड इफेक्ट अनेक असतात. झोप येणे, काहीच करावेसे न वाटणे, हॉट फ्लॅश येणे अशा अनेक गोष्टी होत असताना त्या दिवसांमध्ये तरी महिला मन लावून काम करू शकतील का? नुकतंच मेफ्टाल स्पास गोळी महिलांनी सरसकट घेऊ नये असं सरकार कडून सांगण्यात आलं. सेफ्टी अलर्ट देण्यात आला, कारण त्या गोळी मधल्या घटकामुळे महिलांना पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, ड्रेस सिंड्रोमला सामोरं जावं लागू शकतं असं सांगण्यात आलं.
आपल्याकडे अजूनही अनेक ऑफिसमध्ये सध्या सॅनिटरी नॅपकीनची सोय नसते, तर हॉट वॉटर बॅग, औषधे तर फार लांब राहिली. मग त्या दोन दिवसांसाठी महिलेला करू दे आराम, असुदे ना सोय, हरकत काय?
माझं फेमिनिझम बद्दलचे मत थोडं वेगळं आहे. मला असं वाटतं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी जितक्या योजना शासन, प्रशासनाकडून सुरू करण्यात येतायत, जितक्या संधी महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या जातायत, त्या संधी, योजनांचा फायदा तिला तेव्हाच घेता येईल जेव्हा पुरुष तिच्या मागे खंबीरपणे उभे असतील आणि तिला साथ देतील. जसं प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तसच प्रत्येक स्त्रिच्या मागे जोपर्यंत पुरुष खंबीरपणे उभा राहत नाही तोपर्यंत तिचं बाहेरच्या जगातलं आयुष्य काही सोप होणार नाही.
मग ते तिचे वडील असो, भाऊ, बॉयफ्रेंड, मित्र किंवा अगदी बॉसही. आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. प्रश्न फक्त समान हक्क आणि मासिक पाळीत सुट्टी मिळणं हा नाहीचे! स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक समजून घेऊन, एकमेकांच्या गरजा समजून घेऊन मग चर्चा आणि निर्णय होणं गरजेचं आहे. त्यात महिलांनी देखील समान हक्कांच्या नावाखाली गोष्टींचा, कायद्यांचा गैरवापर करू नये, असं मला वाटतं. एखादी सोय एक महिला म्हणून तुम्हाला दिली गेली आहे तर दुसरीकडे त्याचा वापर करताना देखील विचार झाला पाहिजे. पुरुषांवर अन्याय करून, त्यांना कमी लेखून स्वतःच महत्त्वाचं वाढवण्यात फेमिनिझम नाही. मासिक पाळीत सुट्टी मिळत असेल तर ती त्याच दिवसांसाठी वापरली गेली पाहिजे. अजूनही भारतात अधिकाधिक घरांमध्ये ( आणि हे पुरुष मंडळींना बोचणारे असलं तरीही खरं आहे ) स्त्रीलाच घरातलं सगळं बघून, आवरून, सांभाळून बाहेर नोकरीसाठी जावं लागतं. जी व्यक्ती प्रत्येकासाठी झगडते, झटते, खंबीरपणे घर, नोकरी, संस्कार, प्रेग्नंसी सगळ्याला सामोरं जाते, तिच्यासाठी एखादी सोय असल्यास काय हरकत आहे?